Devendra Fadnavis on MVA Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला (Maha Vikas Aghadi Morcha) परवानगीची अडचण नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. मुंबईत (Mumbai) उद्या (17 डिसेंबर) होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चा अद्यापही पोलिसांनी परवागनी दिलेली नाही, असं मविआ नेत्यांनी म्हटलं. त्याबाबत विचारलं असता मोर्चाला परवानगीची अडचण नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासह भाजपचे नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी मुंबईत 17 डिसेंबर रोजी महामोर्चा काढणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरु आहे. लाखोंच्या संख्येने गर्दी जमवण्याचं लक्ष्य महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर आहे. परंतु मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी मिळाली नसल्याचं मविआच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं.
'परवानगीची अडचण नाही'
याविषयी विचारलं असता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मोर्चा शांततेत व्हावा, त्याला परवानगी दिलेली आहे. लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल तर ते करतील. कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, एवढ्यापुरता सरकारचा त्यात हस्तक्षेप असेल. मोर्चाच्या मार्गांसंदर्भात त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलेला मार्ग मान्य केलेला आहे. मला वाटत नाही की परवानगीची अडचण आहे."
मोर्चाचा मार्ग कसा? कोण कोण सामील होणार?
भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोर एका ट्रकवरच सभा आयोजित करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार,सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शरद पवार सुद्धा येण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिवाय महामोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चानेही पाठिंबा दिला आहे.
VIDEO : Devendra Fadnavis on MVA Morcha : मविआच्या मोर्चाला परवानगी देण्यास अडचण नाही - देवेंद्र फडणवीस