मुंबई: भाजपच्या विजयाचा गुलाल उडाला गुजरातमध्ये, पण त्या विजयात मोठा वाटा ठरला तो महाराष्ट्राच्या शिलेदारांचा. त्यातलं सर्वात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष मराठमोळे सी. आर. पाटील (CR Patil) म्हणजेच चंद्रकांत पाटील. गुजरातमधील पटेल, जैन, शाह आणि मेहतांच्या गराड्यात मराठमोळे सीआर पाटील यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय आणि भाजपच्या अभूतपूर्व यशाचे शिल्पकारही ते ठरले आहेत. 


CR Patil: पोलीस हवालदार ते राजकारणात प्रवेश 


भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर उर्फ चंद्रकांत पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातले आहेत. पण गेल्या 40 वर्षांपासून ते नवसारीमध्ये स्थायिक आहेत. राजकारणात प्रवेश करण्याआधी सीआर पाटील हे पोलीस खात्यात हवालदार होते. पोलीस खात्यात असतानाच पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी सीआर पाटील यांनी एक संघटना स्थापन केली होती. पण सरकारी खात्यामध्ये संघटना स्थापन करणे त्यांच्या वरिष्ठांच्या पचनी पडलं नाही. त्यामुळे त्यांना निलंबितही करण्यात आलं. त्यामुळे सीआर पाटील यांनी नोकरीला रामराम ठोकलाआणि स्वतःला पूर्णवेळ राजकारणात झोकून दिलं.


CR Patil Gujarat: प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर 'अब की बार, 150 पार'ची तयारी सुरू 


सन 1980 साली सीआर पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. सुमारे 25 वर्षे पक्षाचं काम केल्यानंतर त्यांना औद्योगिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं. 2009 साली ते नवासरीचे खासदार बनले. 2014 आणि 2019 सालच्या निवडणुकीतही त्यांनी दणदणीत विजय मिळवला. 


सुमारे 15 वर्षांच्या सत्तेनंतर सीआर पाटील यांनी गुजरातमधल्या पक्षसंघटनेची जबाबदारी आपल्या हाती घेतली आणि तिथूनच सुरु झाली 'अब की बार, 150 पार'ची तयारी. 2020 साली झालेल्या पोटनिवडणुकीत आठही जागांवर भाजपने विजय मिळवला त्यानंतर राज्यसभेची निवडणुकही बिनविरोध करुन दाखवली. त्यानंतरच्या 31 जिल्हा परिषदा, 205 तालुका पंचायती आणि 75 नगरपालिका काबीज केल्या.


सीआर पाटील यांच्या या विजयी घोडदौडीमागे पेज कमिटीचं महत्त्व मोठं आहे. प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी राज्यभरातल्या मतदारसंघांमध्ये पेज कमिटींची स्थापना केली. या पेज कमिटींद्वारे कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचे सत्र सुरू केले. अख्ख्या गुजरातमध्ये वादळी दौरे सुरु केले. कोरोना काळात सीआर पाटील यांनी केलेल्या कार्याचं तर अख्ख्या राज्यात कौतुक झालं. 


पण विधानसभा निवडणूक ही सीआर पाटील यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी परीक्षा होती. कारण समोर काँग्रेससोबत नव्याने आलेल्या आम आदमी पक्षाचं आव्हान होतं. टीका चौफेर सुरु होती, पण सीआर पाटील यांचा तोल कधीच ढळला नाही. ते जीव तोडून प्रचार करत राहिले आणि त्याचा परिणाम समोर आहे. 


Gujarat Election Result 2022: भाजपच्या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार 


सन 2017 साली साली भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या, त्याच जागा आता 150 पेक्षा जास्त झाल्या आहेत. 2017 साली भाजपला 49 टक्के मते होती, यंदा भाजपला 53 टक्के मते मिळाली. पण सीआर पाटील यांच्या या यशाचं मूळ त्यांच्या समर्पणात दडलं आहे. 


अर्थात सीआर पाटील यांची ही झाली चांगली बाजू. पण कधीकाळी सीआर पाटील यांना तुरुंगाच्या गजाआडही जावं लागलं होतं. असं असलं तरी आज सीआर पाटील यांच्या करिष्म्यामुळे भाजपनं गुजरातच्या 85 टक्के जागांवर ताबा मिळवला आहे. म्हणूनच विजय गुजरातचा असला तरी त्या विजयाचा खरा शिल्पकार हा मराठीच आहे.