रामराजेंच्या पाठीशी उभं राहा, रामदास आठवलेंच्या आवाहनानंतर एकच गोंधळ
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2019 11:24 PM (IST)
माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी साताऱ्यातील फलटणमध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांच्यासह अनेक माजी आमदार या सभेला हजर होते.
सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांचं भाषण म्हणजे चारोळी, कविता, हशा हे ठरलेलंच. पण फलटणमधील सभेत रामदास आठवले तर चक्क ज्या उमेदवाराचा प्रचार करायला आले होते त्याचंच नाव विसरले आणि दुसऱ्याच उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं. राजराजे निंबाळकर यांना मोठ्या मतांनी निवडून द्या असं आठवले म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी साताऱ्यातील फलटणमध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रामदास आठवलेंनी भाषणातून राजराजेंना निवडून द्या, असं आवाहन केलं. यानंतर सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांचा आरडाओरडा सुरु झाल्याने आठवलेंनी भाषण थांबवलं. कार्यकर्त्यांचा गोंधळ का सुरु आहे, हे ऐकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रामराजे नाही तर रणजित नाईक निंबाळकर हे आपले उमेदवार आहेत, असं त्यांना सांगितलं. यानंतर थोडा वेळ थांबून आठवलेंनी चूक दुरुस्त केली. "रणजित लढणार आहे आता, शांत राहा. ही निंबाळकर नावाची गडबड आहे सगळी," असं म्हणत भाषण पूर्ण केलं. भाषणापूर्वी मत्र रामदास आठवलेंनी माढ्यावर रचलेली कविताही ऐकून दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांच्यासह अनेक माजी आमदार या सभेला हजर होते.