Indapur Gram Panchayat Election: इंदापूर (Indapur News) तालुक्यातील 26 ग्रामपंचायत पैकी 18 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची निर्विवाद सत्ता आल्याचा दावा माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केला आहे. यासोबतच हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) वरती सडकून टीका करत इंदापूर तालुक्यातील  (Indapur Taluka) निवडणूक ही एका बाजूला धनशक्ती तर दुसऱ्या बाजूला जनशक्तीची होती. ना आमच्याकडे तालुक्याची सत्ता ना आम्ही ठेकेदाराचं कमिशन खातो, असं असताना मात्र इंदापूर तालुक्यातील जनतेने धनशक्तीला कधीही थारा दिला नसल्याचंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. 


इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जरी वर्चस्व मिळवलं असलं तरी काही गावांमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभव पत्करावा लागला आहे. यावरून हर्षवर्धन पाटील यांनी सल व्यक्त केली. मात्र 2019 च्या विधानसभेत बोरी गावात मी दोन ते अडीच हजार मताधिक्यानं कमी होतो. माझी त्यावेळची विधानसभा केवळ एका गावाच्या मताधिक्यानं गेलीय असं म्हणत आज त्या बोरी गावात भाजपाचे सदस्य निवडून आले, याचा आनंदही असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


17 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात मुंबईमध्ये हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावरून भारतीय जनता पार्टीचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस दीड लाख तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दीड लाख तर काँग्रेस म्हणाली एक लाख लोक मोर्चात सहभागी होणार, मात्र प्रत्यक्षात तेरा ते चौदा हजाराचं लोक तिथे आले अशी अवस्था त्या मोर्चाची झाली. सर्वात पहिलं भाषण करायाला संजय राऊत उठले आणि मोर्चाची दिशा कुठल्या दिशेला गेली हे त्यांनाही कळालं नाही. सरकारच्या विरोधात जो मोर्चा काढला होता त्यात केलेल्या वल्गना आणि तो मोर्चा फेल गेल्याची टीका भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.


पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना या पुढील काळात कोणत्याही विकास कामाची भूमिपूजनानं आणि उद्घाटनं ही पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची परवानगी काढल्याशिवाय करता येणार नाही, असा फतवा चंद्रकांत पाटील यांनी काढल्याचं भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये सांगितलं आहे. यामुळे विकास कामाच्या श्रेयवादाच्या लढाईला चाप बसणार आहे.


इंदापूर तालुक्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. या सर्व कामांचं ऑडिट करणार असल्याचं सांगत शंभर रुपयाचं काम जर 40 रुपयांत करण्याची पद्धत असेल, तर ते काम दर्जात्मक होणार आहे का? असा प्रश्नही हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. इंदापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झालेल्या सरपंच सदस्यांच्या सन्मान सोहळा प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.