सांगली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेची जोरदार हवा सुरू आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातील महायुती आणि भाजपचे उमेदवार आमदार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आयोजित करण्यात आली आहे. या सभेतून पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावर भाष्य केलं. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत, आपण सध्या बोलतोय एक, लिहतोय एक आणि मीडिया लगेच मागे लागते, सोशल मिडिया देखील खूप ताकदवान झालाय, असे म्हणत पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यासंदर्भात बोलण्याचे टाळले. सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं. मी कोणत्याही सभेमध्ये असं वक्तव्य केलेलं नाही. प्रिंट मीडियामध्ये काय छापून आलं याच्यावर मी भाष्य अजिबात करणार नाही म्हणजे नाही, असे पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. 


मी भाजपची स्टार प्रचारक असल्याने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात माझ्या सभा होत असल्याने मला हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणत कटेंगे तो बटेंगे या विषयावरील वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गेले पंधरा वर्षे मी राजकारणात काम करत आहे. गेल्या 25 दिवसांपासून मी सभा घेत आहे. 25 विधानसभा मतदारसंघात मी जे बोलले आहे तेच बघा. पेपर मध्ये काय छापून आलं याच्यावर मी अजिबात उत्तर देणार नाही म्हणजे नाही. या विषयावर मी कोठे बोललेले नाही. पण त्याने काय केलं हे माहीत नाही. माझा मुद्दा विकासाचा आहे. या मुद्द्यापासून मला हटवणं, तसेच माझ्या इतक्या सभा होत आहेत त्यापासून हटवण्यासाठी हे प्रयत्न आहे, असेही पंकजा यांनी म्हटले. 


काय आहे विषय


महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणेची गरज नाही. माझ्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. केवळ मी भाजपमध्ये आहे म्हणून मी 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचे समर्थन करणार नाही, असे परखड वक्तव्य भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केल्याचं एका वर्तमानपत्रातून छापून आलय. पंकजा यांनी विधानसभेच्या प्रचाराच्यानिमित्ताने नुकतीच एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतमीध्ये पंकजा मुंडे यांनी 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेबद्दल काहीशी नापसंती व्यक्त केली आहे. मात्र, मराठी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्याचा घुमजाव करत जास्त प्रतिक्रिया देणं टाळलं. 


हेही वाचा


ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ