मुंबई: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. सकाळी आठ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे.  मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप मोठ्या पिछाडीवर पडला होता. मात्र, नंतरच्या भाजपने(BJP) मोठी मुसंडी मारत हरियाणात तिसऱ्यांदा सत्तास्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. हरियाणात सत्तास्थापनेसाठी 46 चा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपचे उमेदवार 49 जागांवर आघाडीवर असून त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या बहुतांश फेऱ्या पार पडल्याने हरियाणात भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. 


शेतकरी (Farmers) आणि कुस्तीपटूंचे आंदोलन असंवेदनशीलपणे हाताळल्याने देशभर नाचक्की झाल्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Elections Results) भाजपला फटका बसेल, अशी शक्यता होती. या प्रतिकूल परिस्थितीमुळे बहुतांश एक्झिट पोल्समध्येही भाजपचा पराभव होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्ष निकालावर नजर टाकल्यास वेगळी परिस्थिती दिसत आहे. 


गेल्यावेळी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची निवडणूक एकत्र झाली होती. मात्र, यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होऊ घातली आहे. त्यामुळे आता हरियाणा विधानसभेच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात  भाजपला मोठा फटका बसला होता. भाजपला अवघ्या 9 जागांवर विजय मिळाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला होता. त्यामुळे हरियाणातील निकालामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा आत्मविश्वास दुणावणार आहे. 


इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दाखला देत देशातील हवा बदलल्याचा प्रचार केला जात होता. पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा आता पूर्वीसारखा राहिला नसल्याचेही बोलले जात होते. मात्र, हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा पराक्रम करुन भाजपने अजूनही आपली ताकद कायम असल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात शरद पवार यांनी महायुतीतील नेत्यांना गळाला लावण्याचा सपाटा लावला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याबाबतही सहानुभूतीचा फॅक्टर अजूनही कायम असल्याची चर्चा आहे. याशिवाय, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण आणि शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर महायुती सरकार काहीसे बॅकफूटवर गेले होते. लाडकी बहीणसारखी लोकप्रिय योजना सुरु करुनही विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीला अपेक्षित असलेला बुस्टर मिळत नव्हता. त्यामुळे भाजप आणि महायुतीचे नेते काहीसे चिंतेत होते. या पार्श्वभूमीवर हरियाणा विधानसभेचा निकाल हा महायुतीचा हुरुप, आत्मविश्वास वाढवणारा ठरु शकतो. 


सर्वेक्षणांचे अंदाज फेल, महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं


गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेकदा अंतर्गत सर्व्हे करण्यात आले आहेत. यामध्ये विधानसभेला मविआला मोठे यश मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच मविआतील तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते जोशात आहेत. परंतु, हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सचा अंदाज पूर्णपणे चुकताना दिसला. एक्झिट पोल्सनी हरियाणात काँग्रेसची एकहाती सत्ता येण्याचे अंदाज वर्तविले होते. परंतु, प्रत्यक्ष निकालात काँग्रेस पक्ष बहुमताच्या आसपासही दिसत नाही. त्यामुळे सर्वेक्षण किंवा एक्झिट पोल्स या केवळ जर तरच्या गोष्टी आहेत,त्यावर पूर्णपणे विसंबून राहणे धोक्याचे ठरु शकते, हा धडा महाविकास आघाडीने शिकायला पाहिजे.


हरियाणात भाजपला ओबीसी फॅक्टरने तारलं


हरियाणात भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेले काही निर्णय फायदेशीर ठरले. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने हरियाणात नेतृत्त्वबदल केला. मनोहरलाल खट्टर यांच्याऐवजी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. हरियाणात शेतकरी आंदोलनामुळे जाट मतदारांच्या नाराजीचा फटका बसणार, हे भाजपला माहिती होते. त्यामुळे नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपदी बसवून भाजपने ओबीसी कार्ड खेळले. त्यामुळे ओबीसी आणि सवर्ण समाजाचा प्रभाव असलेल्या कर्नाल, फरीदाबाद, गुडगाव, भिवानी-महेंद्रगढ आणि कुरुक्षेत्र या पाच जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. 


महाराष्ट्रातही सध्या मनोज जरांगे यांच्या  मराठा आंदोलनामुळे भाजप नेत्यांना रोषाला सामोरं जाव लागत आहे . विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची महायुतीबाबत काय भूमिका असणार हे महत्त्वाचं असेल. त्यामुळे हरियाणाप्रमाणे भाजप विधानसभा निवडणुकीत जातीय फॅक्टरचा समतोल साधून परिस्थिती बदलू शकते का, हे पाहावे लागेल.


आणखी वाचा


हरियाणाचा खेळ संपलेला नाही, साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबा; भाजप माईंड गेम खेळतंय; काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा खळबळजनक आरोप