Prashant Kishor On Haryana Election: हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, हरियाणामध्ये काँग्रेस पुढे आहे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) सोबत कडवी लढत सुरू आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे समन्वयक प्रशांत किशोर यांनी मोठे वक्तव्य केलं होतं. नऊ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची दिशा आणि स्थिरता ठरवतील, असे ते म्हणाले होते.


प्रशांत किशोर यांनी केला मोठा दावा 


निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे समन्वयक प्रशांत किशोर यांनी सप्टेंबरमध्ये इंडिया टीव्हीला मुलाखत दिली होती. यादरम्यान ते म्हणाले होते की, "9 राज्यांच्या (जम्मू-काश्मीर, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम) विधानसभा निवडणुकांचे निकाल या सरकारची स्थिरता ठरवतील. हे सरकार कोणती दिशा घेणार हेही हे निकाल ठरवतील. या नऊपैकी पाच-सहा राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला तर स्थिरतेचा प्रश्न नक्कीच निर्माण होईल, असंही ते म्हणाले होते. 


2024 च्या लोकसभेचे निकाल चांगले असल्याचे सांगताना प्रशांत किशोर म्हणाले होते, लोकांनी पंतप्रधान मोदींना स्पष्ट संदेश दिला आहे की, त्यांनी सरकार चालवावे. त्याचबरोबर त्यांना असेही सांगितले आहे की, तुम्ही देव नाही, सरकार चालवा, पण हुकूमशाहा सारखं नाही, लोकशाहीतील नेत्याप्रमाणे सरकार चालवा. जनतेने मोदींना संदेश दिला आहे की त्यांनी सरकार काळजीपूर्वक चालवावे."


भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता


हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. हरियाणातील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत दिसत होते. पण काही काळानंतर चित्र पालटले आहे, आता दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडी बहुमताच्या जवळ आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसल्याचे सुरुवातीच्या ट्रेंडवरून स्पष्ट झाले होते. मात्र, आताच्या घडीला समोर आलेल्या निकालानुसार, हरियाणात ऐतिहासिक हॅटट्रिकच्या दिशेने भाजप वाटचाल करत आहे, तर काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी पडल्याचं चित्र आहे, पुढे काय होईल याबाबत सर्वजण उत्सूक आहेत.