Gulabrao Patil Profile in Marathi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पडला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रि‍पदे आली. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळाली आहे. 


2009 पासून जळगाव ग्रामीणचे आमदार राहिलेल्या गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. गुलाबराव पाटील यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळालं आहे. यानिमित्ताने त्यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊयात.


गुलाबराव पाटील यांची राजकीय कारकीर्द


गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या पाळधी ग्रामपंचायतीपासून राजकारणाची सुरुवात केली. 1999 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून एरंडोल विधानसभा मतदारसंघात उमेदवारी आणि विजय मिळवला. 2009 चा अपवाद वगळता जळगाव ग्रामीणमधून सातत्याने विजयी झाले. 2022 मध्ये शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना त्यांनी साथ दिली.


2016 मध्ये सहकार राज्यमंत्री. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री. 2022 मध्ये महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून ते होते.


विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) सर्व पाच जागा निवडून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. 


गुलाबराव पाटील प्रोफाईल



  • जन्म तारीख 5 जून 1969

  • शिक्षण 12 आर्ट्स

  • छंद ,गायन,अभिनय, राजकारण आणि क्रिकेट

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याने आणि भाषण शैलीने प्रेरित होऊन वयाचा 25 व्या वर्षी आपल्या पाळधी गावात शिवसेना शाखा स्थापन केली,आणि शाखा प्रमुख झाले. राजकारणाची पहिली सुरुवात शाखा प्रमुख पासून केली.

  • 1991 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभे मधे गुलाबराव पाटील यांना बोलण्याची पहिली संधी मिळाली. यावेळी त्यांनी केलेलं तडाखेबाज भाषण ऐकून बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांचं कौतुक केलं. आणि त्यावेळी पासून खान्देशची मुलुख मैदान तोफ अशी त्यांची ओळख निर्माण झाली ती आजतागायत कायम राहिली आहे
    अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिल्याने अनेक आंदोलने केली. अनेक गुन्हे त्यामुळे त्यांच्या विरोधात नोंदविली गेली. वेळप्रसंगी त्यांना कारावासही भोगावा लागला.

  • 1995 ते 1999 गुलाबराव पाटील यांनी जिल्हाप्रमुख पद भूषविले.

  • 1999ते 2004 आणि 2004 ते 2009 असे सलग दोन वेळा त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातून ते निवडून आले.

  • 2019 नंतर 2024 साली पुन्हा एकदा त्यांनी विधानसभा निवडणुकीत चौथ्या वेळेस विजय मिळविला आहे.

  • जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री ते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री पद त्यांनी भूषविले आहे.

  • सुरुवाती पासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत.


हे ही वाचा