Gujarat Elections 2022: गुजरात निवडणुकांचं (Gujrat Assembly Election) बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच आता भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. 


भाजप (BJP)नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी बोलताना सांगितलं की, "पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये पक्षानं बहुमत मिळवल्यास भूपेंद्र पटेल हेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील." त्यामुळे भूपेंद्र पटेल हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 


"जर भाजपला गुजरातमध्ये बहुमत मिळाले तर भूपेंद्र पटेल (Bhupendrabhai Patel) पुढील मुख्यमंत्री असतील," असं शाह यांनी सीएनएन-न्यूज18 कार्यक्रमात सांगितलं. भुपेंद्र पटेल यांनी सप्टेंबर 2021 मध्ये विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली होती. भाजपच्या या भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. भूपेंद्र पटेल घाटलोडिया मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले असून यंदा त्यांना पुन्हा त्याच मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


तिकीट कापल्यामुळे आमदार नाराज? 


गुजरात निवडणुकीत भाजपकडून अनेक आमदारांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना अमित शाह म्हणाले की, "प्रत्येक वेळी 30 टक्क्यांच्या आसपास चेहरे बदलतात. एक चेहरा कधीच कायमचा नसतो. आम्ही रेकॉर्ड तोडण्याचं राजकारण करत नाही, आम्ही नेहमीच गुजरातच्या लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरलो आहोत." गुजरातनं कधीही कोणत्याही तिसऱ्या पक्षाला स्विकारलेलं नाही. गुजरात निवडणुकीत आम्ही प्रचंड बहुमताने जिंकू आणि पुन्हा एकदा भाजपचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. 


कोण असेल काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा? 


यंदा गुजरात निवडणुकीत तिहेरी लढत दिसणार आहे. काँग्रेस आणि भाजपसोबतच आपनंही गुजरात निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपपूर्वी आपनं सार्वजनिक सर्वेक्षण केल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते इसुदान गढवी हेच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असल्याची घोषणा केली होती. दरमन्यान, गुजरातच्या एकूण 182 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान केलं जाणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Gujarat Assembly Election 2022: काँग्रेसने आणखी पाच जागांसाठी उमेदवार केले जाहीर, एका जागेवर उमेदवार बदलला