National Sports Awards 2022 : 2022 सालचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं सोमवारी विविध कॅटेगरीतील पुरस्कारांची घोषणा केली. टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमलला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, जाहीर केलेल्या यादीत एकाही क्रिकेटपटुचं नाव नाही. पण, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांची द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते 30 नोव्हेंबरला पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. 


जवळपास दोन दशकं आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळत असलेल्या स्टार टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याची देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी (Major Dhyan Chand Khel Ratna Award) निवड करण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 समारंभात त्याचा या पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. अचंत शरथ कमल हे टेबल टेनिसमधील एक मोठं नाव. त्यानं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकं (एकूण सात सुवर्णपदकं) जिंकली आहेत.


केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयानं सोमवारी (14 नोव्हेंबर) जाहीर केलेल्या यादीत अर्जुन पुरस्कारासाठी (Arjun Award 2022) 25 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या यादीत बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन, एल्डोस पॉल, अविनाश साबळे, बॉक्सर निखत जरीन यांसारख्या स्टार्स खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे. यासोबतच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सात प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनाही द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करतील. 


रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार 


विशेष म्हणजे यंदा एकाही क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार किंवा खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं नाही. क्रिकेट विश्वातून फक्त सुप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांची केवळ द्रोणाचार्य पुरस्कारांच्या यादीत (लाईफटाईम कॅटेगरी) निवड झाली आहे. दिनेश लाड यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला प्रशिक्षण दिलं आहे. 


मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार : अचंत शरत कमल


'या' खेळाडूंना अर्जुन पुरस्काराचा सन्मान 


सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश मुकुंद साबले (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निकहत जरीन ( बॉक्सिंग), भक्ति प्रदीप कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञानानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (जूडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवलकर (मल्लखांब), इलावेनिल वलारिवन (शूटिंग), ओमप्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकुर (वेट लिफ्टिंग), अंशु (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशु), मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्निल संजय पाटिल (पॅरा स्विमिंग), जेरलिन अनिका जे (डेफ बॅडमिंटन).


द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी प्रशिक्षकांसाठी): जीवनजोत सिंह तेजा (नेमबाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा सिद्धार्थ शिरूर (पॅरा शूटिंग), सुजीत मान (कुस्ती).


द्रोणाचार्य पुरस्कार (लाईफटाईम कॅटेगरी): दिनेश जवाहर लाड (क्रिकेट), बिमल प्रफुल्ल घोष (फुटबॉल), राज सिंह (कुस्ती).


खेळांमध्ये लाईफटाईम कॅटेगरीत अचीव्हमेंटसाठी ध्यानचंद पुरस्कार: अश्विनी अकुंजी सी (अॅथलेटिक्स), धर्मवीर सिंह (हॉकी), बीसी सुरेश (कबड्डी), नीर बहादुर गुरुंग (पॅरा अॅथलेटिक्स).


राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2022: ट्रांस स्टेडिया इंटरप्रायजेस प्रायवेट लिमिटेड, कलिंगा सूचना प्रौद्योगिकी संस्थान, लद्दाख स्की आणि स्नोबोर्ड संघ.


मौलाना अबुल कलाम आझाद (MACA) ट्रॉफी: गुरु नानक देव विश्वविद्यालय, अमृतसर.