Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. अशातच गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी आणखी पाच जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तर एका जागेवर उमेदवार बदलला आहे. काँग्रेसने ध्रंगधारा मतदारसंघातून छतरसिंह गुंजारिया, मोरबीमधून जयंती जराजभाई पटेल, राजकोट पश्चिम मतदारसंघातून मनसुखभाई जादवभाई कलारिया, जामनगर ग्रामीणमधून जीवन कुंभारवाडिया, गारियाधरमधून दिव्येश मनुभाई चावडा यांना तिकीट दिले आहे. तर बोताडमधून रमेश मार यांच्या जागी मनहर पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे.
तत्पूर्वी शनिवारी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली होती. यामध्ये नऊ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, चौथ्या यादीनुसार द्वारकामधून मालुभाई कंडोरिया, भावनगर ग्रामीणमधून रेवत सिंग गोहिल, भावनगर पूर्वमधून बलदेव सोळंकी आणि भरूचमधून जयकांत भाई पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात होणार मतदान
याआधी शुक्रवारी काँग्रेसने निवडणुकीसाठी 43 उमेदवारांची पहिली यादी, गुरुवारी 46 उमेदवारांची दुसरी आणि शुक्रवारी सात उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुजरातमधील विधानसभेच्या 182 जागांपैकी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 1 डिसेंबरला तर 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. यानंतर 8 डिसेंबरला हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये भाजप गेल्या सहा वेळा सत्तेत आली असून सलग सातव्यांदा विजयाचे लक्ष पक्षाने ठेवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत जागा जिंकण्याच्या दृष्टीने नवीन विक्रम करण्यासाठी पक्ष संघटना आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे. त्याचबरोबर यावेळी आम आदमी पक्षही निवडणूक रिंगणात उतरला असून भाजपला थेट टक्कर देण्यासाठी निवडणूक प्रचारात आपली सर्व ताकद पणाला लावत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेली आप यावेळी गुजरातमध्येही आपलं खातं उघडणार, असं पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हेही गुजरात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपला पूर्ण जोर लावत आहे. आतापर्यंत त्यांनी गुजरातमध्ये अनेकसभा देखिल घेतल्या आहे. यामुळे भाजपसमोर यंदा काँग्रेससोबतच आपचे आव्हान देखिल असणार आहे.