Goa Election Results 2022: पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. त्यापैकी निकाल म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पराभव. चंद्रकांत कवळेकर (केपे मतदारसंघ) आणि मनोहर आजगांवकर (मडगाव मतदारसंघ) या दोघांचा पराभव झाला आहे. केपे मतदारसंघात काँग्रेसच्या अॅल्टन डिकॉस्ता यांनी चंद्रकांत कवळेकर यांना (3792 मतांनी) पराभूत केलं तर मडगाव मतदारसंघात मनोहर आजगावकर यांना काँग्रेसच्या दिगंबर कामत यांच्याकडून (7794 मतांनी) हार स्वीकारावी लागली.


मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विजयाची हॅटट्रिक
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे. साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते. काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना जोरदार लढत दिली. परंतु प्रमोद सावंत यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला. या विजयासह त्यांनी साखळी मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साजरी केली.


भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा
डॉ. चंद्रकांत शेट्ये (बिचोली मतदारसंघ), अँटोनियो वास (कुठ्ठाळी मतदारसंघ), अलेक्सो लॉरेन्को (कुडतरी मतदारसंघ) या तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी 21 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे अपक्षांच्या साथीने गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अपक्षांसह मगोपच्या विजयी आमदारांना सोबत घेऊन काठावरचं नाही तर पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्याचा भाजपचा इरादा आहे. 


14 मार्च रोजी शपथविधी?
गोव्यात भाजप 20, काँग्रेस 12, मगोप+ 02, आप 02, इतर 04 जागांनी आघाडीवर आहे. गोव्यात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. 14 मार्च रोजी शपथविधी होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 


उत्पल पर्रिकर यांचा पराभव
गोवा विधानसभा निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा निकाल पणजी मतदारसंघातला आहे. अपक्ष उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा 800 मतांनी पराभव झाला. भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांचा पराभव केला. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.


संबंधित बातम्या