Goa Election Results 2022: पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे. साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते. काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना जोरदार लढत दिली. परंतु प्रमोद सावंत यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला. या विजयासह प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केली आहे.


"या विजयचं श्रेय सर्व कार्यकर्त्यांचं आहे. त्यासाठी त्यांचे आभार, अशी प्रतिक्रिया प्रमोद सावंत यांनी विजयानंतर दिली. तसंच मगोप आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करु, असंही ते म्हणाले. 


दरम्यान 40 जागांच्या गोवा विधानसभेत भाजप 19, काँग्रेस 12, मगोप 03, अपक्ष 02 आणि इतर 04 जागांनी आघाडीवर आहेत.  


साखळी मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक
प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री आहे. भाजपच्या तिकीटावर ते साखळी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरले होते. पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या प्रमोद सावंत यांचा साखळी मतदारसंघातील हा तिसरा विजय आहे. पहिला विजय त्यांनी 2012 मध्ये मिळवला होता. तर 2017 मध्ये साखळी विधानसभा मतदारसंघातूनच आमदार झाले होते. तर त्याआधी म्हणजेच 2008 च्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु सावंत यांनी विजयाची हॅटट्रिक करत आपला गड राखला. 


प्रमोद सावंतांनी 2012 मध्ये काँग्रेसला पराभूत करुन पाय रोवले
साखळी मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास 2002 मध्ये या जागेवर भाजपने विजय मिळवला होता. परंतु 2007 च्या निवडणुकीत ही जागा काँग्रेसने जिंकली. त्यानंतर 2012 मध्ये भाजपच्या तिकीटावर प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या प्रताप गौंस यांचा 6918 मतांनी पराभव केला. मग 2017 मध्ये प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांना पराभूत करत दुसऱ्यांदा आमदार बनले.


गोव्याच्या 40 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. त्याची आज मतमोजणी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 79.61 टक्के मतदान झालं. सर्वाधिक 89.63 टक्के मतदान साखळी मतदारसंघातच झालं होतं. राज्यात भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचं स्पष्ट आहे.