काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची आपल्याला अपेक्षा होती, परंतु तिकीट न मिळाल्याने पक्ष सोडला, असं म्हणणं चुकीचं असल्याचं चतुर्वेदी म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाल्यानंतरही काँग्रेसमधील नाराजांचं आऊटगोईंग सुरुच आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी आज (शुक्रवारी) सकाळी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर दुपारी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
निवडणुकांमध्येच 'तहलका', काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर?
प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबईसह देशभरात शिवसेनेचा प्रसार करण्याचा मानस व्यक्त केला आहे. युवक, महिलांच्या मुद्द्यावर काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ज्या भूमीतून सुरुवात केली, तिच्यापासून दूर जात असल्याच्या भावनेतून शिवसेनेत प्रवेश केल्याचं त्या म्हणाल्या.
प्रियांका चतुर्वेदी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. चतुर्वेदींनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची खिल्ली उडवाणारं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याशी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं होतं. मात्र कारवाईनंतर संबंधित कार्यकर्त्यांचं निलंबन रद्द केल्यामुळे चतुर्वेदींचा संताप झाला होता. ट्विटरवरुनही चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली होती.
काँग्रेसमध्ये आपण दहा वर्ष प्रभावीपणे काम केलं. मात्र आपल्या आत्मसन्मानाला धक्का पोहचवणारं कृत्य केल्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असं सांगताना प्रियांका चतुर्वेदी काहीशा भावूक झाल्या.
इतकी वर्ष एका पक्षासाठी काम केल्यानंतर पक्षांतर केल्याबद्दल मला प्रश्न विचारले जातील, याची कल्पना आहे. परंतु मी विचारपूर्वक निर्णय घेतला आहे, असं प्रियांका चतुर्वेदींनी स्पष्ट केलं.
प्रियांका चतुर्वेदींना त्यांच्या कुवतीचा, बुद्धिमत्तेचा देशाला आणि शिवसेनेला पूर्ण उपयोग होईल अशीच जबाबदारी दिली जाईल, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी?
प्रियांका चतुर्वेदी यांनी डीएनए, तेहलका, फर्स्टपोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. बाल शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य यासारख्या विषयांवर त्या कार्यरत आहेत. पुस्तकांची समीक्षा करणारा चतुर्वेदींचा ब्लॉग हा देशभरातील टॉप टेन वेबब्लॉग्जपैकी एक मानला जातो.
प्रियांका यांनी 2010 साली काँग्रेसमध्ये प्रवेश करुन राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून युवा काँग्रेसचं सचिवपद देण्यात आलं. मे 2013 मध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून निवड झाली होती. सोशल मीडिया, वृत्तवाहिन्यांवर काँग्रेस पक्षाची बाजू हिरीरीने मांडण्यात त्या अग्रेसर असतात.