राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, मनसेचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2019 11:47 AM (IST)
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वकिलांची फौज जमा करुन राज ठाकरेंच्या सभा कशा थांबवता येतील, यावर विचारमंथन केल्याचं मनसेचं म्हणणं आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या जोडगोळीविरोधात महाराष्ट्रभरात सभांचा तडाखा लावला आहे. राज ठाकरेंच्या सभांच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची तोफ थंड करण्यासाठी भाजपने कारवाया सुरु केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा डाव असल्याचा आरोपही मनसेकडून केला जात आहे. राज ठाकरेंची भाषणं थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून प्रेशर येकत असल्याचा दावा मनसेने केला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वकिलांची फौज जमा करुन राज ठाकरेंच्या सभा कशा थांबवता येतील, यावर विचारमंथन केल्याचं मनसेचं म्हणणं आहे. राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकारच काढून घेऊ, असा विचार मुख्यमंत्री करत असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. पुण्यात झालेल्या सभेत मनसे उपाध्यक्ष अभिजीत पानसे यांनी हा खळबळजनक आरोप केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीररित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला नसला, तरी आतापर्यंत झालेल्या सर्वच सभेत राज ठाकरेंनी मोदी सरकारची पोलखोल केली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री धास्तावून हा विचार करत असल्याचा दावा पानसेंनी केला आहे.