भोपाळ : मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एक संतापजनक विधान केलं आहे. शहीद हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला, असं विधान साध्वी प्रज्ञा यांनी केलं आहे. ती भोपाळमधल्या एका कार्यक्रमात बोलत होती.


मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात माझ्याविरोधात पुरावे नसतानाही हेमंत करकरेंनी हेतुपूरस्कपणे कारवाई केली, असा दावा साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे.


'मी म्हटलं होतं की, तुझा सर्वनाश होणार, बरोबर सव्वा महिन्यांनी सुतक लागतं. ज्या दिवशी मी आत गेले त्यावेळी सुतक लागलं. आणि बरोबर सव्वा महिन्यानंतर ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्याला (हेमंत करकरे यांना) मारलं, त्या दिवशी सुतक संपलं', असं साध्वी यांना म्हटलं आहे.

त्यामुळे आता भाजपकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  भोपाळमधून काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपनं साध्वीला उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीवरुन बरीच चर्चाही रंगली. मात्र 'हिंदू दहशतवाद' सारखे शब्द जन्माला घालणाऱ्या दिग्विजय सिंहांविरोधात साध्वीची उमेदवारी योग्यच असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

भोपाळमधून काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी
भाजपने मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला बुधवारी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.