मुंबई: महाराष्ट्राचा गाडा पुढची पाच वर्ष कोण हाकणार, हे या निवडणुकीत ठरणार आहे. सर्वच प्रमुख पक्ष त्यादृष्टीनं तयारी करतायत. भाजप-शिवसेन फॉर्मात आहे. युती तुटेल असं सध्याचं चित्र नाही. जागावाटपाची औपचारिकता बाकी आहे. काँग्रेसला सूर सापडलेला दिसत नाही. राष्ट्रवादीत मात्र नेत्यांचं इतकं आऊटगोईंग होऊनही, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात जोश भरलाय. त्यांच्यावर शिखर बँकेतील घोट्याळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं, राजकारण ढवळून निघालंय. वंचित बहुजन आघाडी आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांनाच गॅसवर ठेवलंय. लोकसभा निवडणुकीतील त्यांची कामगिरी लक्षणीय ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेब आंबेडकरच विरोधी पक्षनेता होतील असं म्हटलं. एमआयएम आणि वंचितची युती होईल का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. मात्र, वंचित आणि एमआयएम काँग्रेसची चिंता वाढवतील हे नक्की. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना यंदा भाजपसोबत नाही. मनसेनं पर्यायानं राज ठाकरेंनी नुकतंच निवडणुका लढवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. मनसे १०० जागा लढणार अशी माहिती आहे. २०१४नंतर महाराष्ट्रातून जवळजवळ गायब झालेला आम आदमी पक्षही यंदा ५० जागांवर निवडणुकीत उतरणार आहे.

महाराष्ट्रात कोणते मुद्दे चर्चेत आहेत?

भाजपनं ही निवडणूक पूर्णत: काश्मिरमधून रद्द केलेल्या कलम ३७०च्या तरतूदींवर नेली आहे. नाशिकमध्ये समारोप झालेल्या 'महाजनादेश' यात्रेत पंतप्रधान मोदींनी आणि मुंबईत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी याच मुद्यावर भर दिल्याचं दिसलं. याशिवाय सरकारी योजनांचे लाभ, मराठवाड्यातील प्रस्तावित वॉटर ग्रिड, शेतकरी विमा योजना, मुंबई-पुणे-नागपूरातील मेट्रो प्रकल्प हे मुद्देही भाजपकडून मांडले जातायत. बरीच वर्ष रखडलेलं मराठा आरक्षण या शासन काळात मार्गी लागलं, त्याचाही फायदा भाजपला होऊ शकतो. शिवसेना सत्तेत असल्यानं हेच मुद्दे सेनेसाठीही आहेत. विशेषत: शेतकऱ्यांना विम्याचे पैसे आपल्या आंदोलनामुळे मिळाल्याचं शिवसेना प्रॉजेक्ट करत आहे. दुसरीकडे, देशातलं मंदीच वातावरण, कोल्हापूर-सांगलीतली पूरस्थिती हाताळण्यात कमी पडलेलं प्रशासन, खड्डेमय रस्ते, हमीभाव, औद्योगिक आघाडीवरची उदासिनता, भाजपकडून आयात करण्यात आलेले नेते हे विषय काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मांडले जातायत. वंचित बहुजन आघाडीकडूनही या मुद्यांशिवाय मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक यांच्या समस्या, धार्मिक ध्रुवीकरण याबाबत प्रचार करण्यात येतोय. मनसेच्या राज ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलनं सरकारची अनेक आघाड्यांवर पोलखोल केली. मात्र, अजून तरी मनसे प्रचाराच्या मोडमध्ये उतरलेली नाही.

मेगा पक्षांतरामुळे इतिहासात नोंदवली जाईल अशी निवडणूक

ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदवली जाईल ती मेगा पक्षांतरामुळे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांनी सत्ताधारी पक्षांची कास धरली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. शिवसेनेपेक्षा भाजपमध्ये सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. हे आमदार/नेते पुढीलप्रमाणे-

राधाकृष्ण विखे-पाटील- काँग्रेस-भाजप

कालिदास कोळंबकर- काँग्रेस-भाजप

निर्मला गावित- काँग्रेस-भाजप

जयकुमार गोरे- काँग्रेस-भाजप

भाऊसाहेब कांबळे- काँग्रेस-शिवसेना

अब्दुल सत्तार- काँग्रेस-शिवसेना

जयदत्त क्षीरसागर- राष्ट्रवादी-शिवसेना

पांडुरंग बरोरा- राष्ट्रवादी-शिवसेना

दिलीप सोपल- राष्ट्रवादी-शिवसेना

शिवेंद्रराजे भोसले- राष्ट्रवादी-भाजप

सचिन अहिर- राष्ट्रवादी-शिवसेना

अवधूत तटकरे- राष्ट्रवादी-शिवसेना

राणा जगजितसिंह पाटील-राष्ट्रवादी-भाजप

संदीप नाईक- राष्ट्रवादी-भाजप

वैभव पिचड- राष्ट्रवादी-भाजप

निरंजन डावखरे- राष्ट्रवादी-भाजप

डॉ. आशीष देशमुख- भाजप-काँग्रेस

सुरेश धानोरकर- शिवसेना-काँग्रेस

अन्य पक्षांतरे- उजयनराजे भोसले (खासदार) राष्ट्रवादी-भाजप, कृपाशंकर सिंह- काँग्रेस-भाजप, नारायण राणे (काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भाजपसोबत)

कसे होते २०१४चे विधानसभा निवडणूक निकाल?

एकूण जागा - 288 व मिळालेल्या मतांची टक्केवारी

भाजप– 122 (27.81%)
शिवसेना– 63 (19.35%)
काँग्रेस– 42 (17.95%)
राष्ट्रवादी- 41 (17.24%)
सीपीआय-एम – 1 (0.39%)
मनसे– 1 (3.15%)
एआयएमआयएम– 2 (0.93%)
समाजवादी पार्टी– 1 (0.17%)
राष्ट्रीय समाज पक्ष– 1 (0.49%)
अपक्ष– 7 (4.71%)
बहुजन विकास अघाडी– 3 (0.62%)
भारिपा बहुजन महासंघ– 1 (0.89%)

मतदानाचं प्रमाण

2004 - 63.44टक्के
2009 - 59.50टक्के
2014 - 63.08टक्के

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

भाजप 23

शिवसेना 18

काँग्रेस 1

राष्ट्रवादी 4

एमआयएम 1

अन्य 1

यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालांचे कल पाहता, विधानसभेच्या किती जागांवर पक्षनिहाय आघाडी?

भाजप– 121
शिवसेना– 112
कांग्रेस- 21
एनसीपी– 23
अन्य– 11

एबीपी माझा-सी वोटर ओपिनियल पोल

या सर्वेक्षणानुसार भाजप-शिवसेना महायुतीला २०५ जागा मिळू शकतात. तर, काँग्रेस व राष्ट्रवादीला ५५ जागांवर विजय मिळू शकतो. अन्य पक्षांना २८ जागांपर्यंत मजल मारता येईल.

महाराष्ट्राचे सामाजिक अंतरंग

एकूण लोकसंख्या- ११ कोटी २३ लाख (सुमारे)

हिंदू – 8.97 कोटी (79.82टक्के)
मुस्लिम– 1.29 कोटी (11.54टक्के)
ख्रिश्चन– 10.80 लाख (0.96टक्के)
शीख – 2 लाख 23 हजार
बौद्ध – 65.31 लाख (5.81टक्के)
जैन– 14.00 लाख (1.24टक्के)
अन्य – 1,78,965 (सर्व आकडे विविध स्रोतांद्वारे अंदाजित)

जातीनिहाय लोकसंख्या- (१९३१च्या जातीय जनगणनेआधारे अंदाजित)

मराठा- 30 टक्के

ब्राह्मण व उच्च जाती- 10 टक्के

मुस्लिम-9टक्के

कुणबी- 13 टक्के

विविध ओबीसी- 15 टक्के

अनुसूचित जाती व जमाती आणि अन्य प्रवर्ग-23 टक्के

२०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण मतदार- ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६

संबंधित बातम्या-

स्वतंत्र लढल्यास भाजप 144, सेना 39, महायुती झाल्यास 205 जागा; एबीपी माझा-सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्राचा कल

भाजप-शिवसेना युतीची बोलणी अंतिम टप्प्यात, लकरच घोषणा: चंद्रकांत पाटील

भाजप-शिवसेना जागावाटपासाठी चर्चेत असणारे हेच ते 5 फॉर्म्युले!