सांगली : शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पुन्हा एकदा शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार असल्यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. युती झाली किंवा नाही झाली तरी या निवडणुकीत शिवसेनेचे सामर्थ्य दाखवून देऊ आणि आपला एक ना एक उमेदवार निवडून आणू असे प्रतिपादन दिवाकर रावते यांनी केले आहे. सांगलीत शिवसेनेच्या  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. रावते यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती. युतीच काय होईल माहीत नाही. पण विधानसभेची निवडणूक शिवसेना जोशाने लढवणार आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेला 144 जागा न मिळाल्यास युती तुटण्याची शक्यता : दिवाकर रावते


 याआधीही रावते यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत बोलताना विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य करुन  खळबळ उडवून दिली होती. लोकसभा निवडणुकीआधी युती करताना भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचं, तसेच विधानसभेला शिवसेनेला 144 म्हणजेच निम्म्या (288 पैकी 144) जागा देण्याचं आश्वासन भाजपने दिलं होतं. त्यामुळे जर शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं रावतेंनी म्हटलं होतं.

दरम्यान, सांगलीतील मेळाव्यात रावते यांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतलं. विधानसभा तोंडावर आली आहे. मेळाव्याची वेळ 11 वाजताची होती, तुम्ही 11 ला यायचे सोडून 12 ला येता हे बरोबर नाही. शिवसेना कार्यकर्त्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. शिस्त हीच शिवसेना आहे असे म्हणत रावते यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

वेळाने येणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे बसवा आणि त्यांना हार घाला असा सल्लाही रावते यांनी दिला. मेळाव्याच्या ठिकाणी येतानाच गाडीतून उतरल्यानंतर रावते यांनी समोर आलेल्या पदाधिकाऱ्याच्या शर्टाची बटने लावली आणि शिवसेनेची शिस्त कशी असायला हवी हे त्या पदाधिकाऱ्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केला.