नवी दिल्ली : राज्यात एकीकडे शरद पवार निवडणूक प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीच मैदानात उतरणार असल्याचं समजतं आहे. 2 ऑक्टोबरला वर्ध्यातील्या गांधी आश्रमातून ते पदयात्रेला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमीत्त काँग्रेस नेत्यांच्या संपुर्ण देशभर पदयात्रा निघणार आहे. या निमित्ताने राहुल गांधी हे अज्ञातवासातून अखेर बाहेर येणार असून 2 ऑक्टोबरला वर्ध्यातल्या गांधी आश्रमातून ते पदयात्रेला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाच्या 18 दिवस आधी राहुल गांधी महाराष्ट्रात दिसणार आहेत. राहुल गांधी पदयात्रा काढत काँग्रेसच्या प्रचारासाठी नारळ फोडणार असल्याची देखील चर्चा आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमीत्त सोनिया गांधी दिल्लीत, राहुल गांधी महाराष्ट्रातल्या वर्धामध्ये तर प्रियंका गांधी हरियाणामध्ये पदयात्रा काढणार आहेत.