Uttarakhand Election Result 2022: उत्तराखंडसह पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. चार राज्यात भाजप आघाडीवर आहे. तर पंजाबमध्ये आपची दमदार एंट्री झाली आहे. उत्तराखंडमध्ये भाजपने सर्व पक्षांना मागे सोडत 41 जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून कडवी स्पर्धा मिळत आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
उत्तराखंडच्या निकालाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे भाजप प्रभारी प्रल्हाद जोशी यांनी हा निकाल अपेक्षेप्रमाणे असल्याचे सांगितले आहे. उत्तराखंडच्या जनतेने आमचे काम दिसले असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुष्कर सिंह धामी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले आहे. मी जनता आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो, असेही ते यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
लोहघाट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार खुशालसिंह अधिकारी विजयी झाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खतिमा मतदारसंघातून एक हजार मतांनी आघाडीवर आहेत. हरिद्वारमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक पिछाडीवर असून, काँग्रेसचे सतपाल ब्रह्मचारी यांनी आघाडी घेतली आहे.
एकूण 70 जागा, बहुमतासाठी 36 जागा आवश्यक
उत्तराखंड या पहाडी राज्यामध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी टक्कर होऊ शकते, असे सांगण्यात आले होते. मात्र ताज्या ट्रेंडमध्ये भाजप 41 जागांसह राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा