निवडणूक आयोगाच्या नवीन अधिसूचनेनुसार उमेदवारांना त्यांच्या परदेशातील मालमत्तेचीही माहिती द्यावी लागणार आहे. आयटी विभाग यामध्ये लक्ष घालणार असून माहितीमध्ये विसंगती आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
लोकसभा निवडणुकांची घोषणा आज संध्याकाळी, निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार
एबीपी माझा वेब टीम | 10 Mar 2019 11:07 AM (IST)
राजधानी दिल्लीत संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आज निवडणुकांची घोषणा झाल्यास, त्या क्षणापासून आचारसंहिता लागू होईल.
मुंबई : सतराव्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. आज (रविवार 10 मार्च) संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिलं आहे. राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. रविवार असल्यामुळे आज निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी मानली जात होती. मात्र 2004 सालच्या लोकसभा निवडणुकाही रविवारी, म्हणजेच 29 फेब्रुवारी 2004 रोजी जाहीर झाल्या होत्या. आज निवडणुकांची घोषणा झाल्यास, त्या क्षणापासून आचारसंहिता लागू होईल. एप्रिल महिन्यापासून मतदानाला सुरुवात होण्याची शक्यता असून मे महिन्यात निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ शकतात. देशात लोकसभेच्या 543 जागा आहेत. महाराष्ट्रात दोन ते तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर देशात सात ते आठ टप्प्यात निवडणूक होण्याचे संकेत आहेत. सोळाव्या लोकसभेची मुदत 3 जून 2019 रोजी संपते. आंध्र प्रदेश, ओदिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम विधानसभा निवडणुकांची घोषणाही आज संध्याकाळी पाच वाजता होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुकाही आजच जाहीर होऊ शकतात. जम्मू काश्मिर विधानसभेच्या निवडणुकीबाबतही निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. VIDEO | लोकसभा निवडणुकांची आज संध्याकाळी पाच वाजता घोषणा होणार लोकसभा निवडणुका नियोजित वेळेनुसारच होणार, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा निवडणुकांवर काही परिणाम होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर 'देशातील लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील' असं उत्तर अरोरा यांनी दिलं. एक लाख 63 हजार 331 मतदान केंद्र, व्हीव्हीपॅट मशिन्स यावेळी वापरली जाणार असल्याची माहितीही निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.