भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन वन डे सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रांचीत खेळलेला सामना हा धोनीने भारतात खेळलेला अखेरचा सामना ठरु शकतो. कारण विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेण्याची शक्यता आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत मोहाली आणि दिल्लीत होणाऱ्या दोन वन डे सामन्यांमध्ये रिषभ पंतवर यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पंतच्या कामगिरीकडे भारतीय निवड समितीचं लक्ष राहील.
धोनीसह वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही पायाच्या दुखापतीमुळे अखेरच्या दोन वन डेतून वगळण्यात आलं आहे. शमीच्या जागी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही रांचीच्या तिसऱ्या वन डेत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 314 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला सर्वबाद 281 धावांचीच मजल मारता आली होती.