मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अहमदनगरच्या जागेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीये. आता थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच या प्रश्नात लक्ष घालणार असल्याची माहिती आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी दक्षिण नगरच्या जागेबाबत मध्यस्थी करणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादीकडून ही जागा लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांवरुन अजूनही आघाडीमध्ये अंतिम निर्णय झालेला नाही. दिल्लीत राहुल गांधींच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकीत सोमवारी तोडगा निघण्याची शक्यता आहे.

VIDEO | शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजेंमध्ये 'दिलजमाई' 



सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु असतानाच काल त्यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांसोबत हेलिकॉप्टरने एकत्र प्रवास केला. त्यामुळे नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला न सोडल्यास सुजय विखे पाटील भाजपची वाट धरतील, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक काल रात्री मुंबईत झाली. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मुंबईतल्या घरी लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ यासारखे नेते उपस्थित होते. याआधी, शुक्रवारी रात्री पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक झाली होती.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला आहे. पालघरची जागा काँग्रेसकडे आहे, मात्र 'बविआ'साठी ही जागा काँग्रेस सोडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:

'औरंगाबादची जागा घ्या, अहमदनगरची जागा द्या'; काँग्रेसने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिल्याची चर्चा

शरद पवार आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्यातील वाद विसरुन सुजय राष्ट्रवादीकडून लोकसभा लढणार?