Election Result 2022 : पाच राज्याच्या आजच्या निकालानं जातींच्या पारंपरिक राजकारणाचे प्रयोगही निष्प्रभ करुन टाकले आहेत. पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री देण्याचा काँग्रेसचा प्रयोग...उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचं मंडल 2.0 हे दोन्ही प्रयोग आजच्या निकालानं अपयशी ठरवले. पंजाबमध्ये प्रस्थापितांना नाकारत लोकांनी आपचा पर्याय निवडला. तर जातीपातींची समीकरणं साधत गठबंधनाची मोळी बांधूनही अखिलेश यांना विजयश्री खेचता आली नाही


 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मायावतींना सोबत घेऊन फसलेले अखिलेश यावेळी मित्र निवडताना सावध होते. त्यांनी छोट्यामोठ्या जातींवर प्रभाव असलेले पक्ष निवडले. सुहेलदेव समाज पार्टीचे ओमप्रकाश राजभर यांना सोबत घेतलं, अपना दलचा एक गट त्यांच्यासोबत होता. शिवाय वेस्टर्न यूपीत जाटांवर प्रभाव असलेला जयंत चौधरी यांचा आरएलडीही त्यांच्यासोबत होता.  पण जातीपातींची ही गणितं निकालाच्या गणितात मात्र तितकी यशस्वी ठरली नाहीत. मागच्यावेळी 60 च्या घरात असलेली सपा यावेळी दीडशेच्या घरात पोहचली. पण भाजपला मात्र रोखू शकली नाही.


 पंजाब हा देशात सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. तब्बल 30 टक्के दलित लोकसंख्या या राज्यात राहतात. काँग्रेसनं चरणजीतसिंह चन्नी यांच्या रुपानं पंजाबला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री दिला पण त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. 


कायम म्हटलं जातं की उत्तर प्रदेशच्या राजकारणावर जातीपातींचा पगडा अधिक आहे. समाजवादी पक्षाकडे मुस्लिम- यादव, बसपाकडे जाटव- दलित हे मतदार जणू ठरलेले अशीच वाटणी होते. पण त्यानंतरही भाजपला इतकं मोठं यश मिळत असेल तर ही पारंपरिक मांडणी बदलण्याची गरजही आजच्या निकालांनी अधोरेखित केलंय. निकालानंतरची मतदानाची टक्केवारी या अभ्यासासाठी जास्त महत्त्वाची असणार आहे. 


इतर महत्त्वाचे बातम्या :


उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी हैं, पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपची घोषणा, मुंबई महापालिका जिंकण्याचाही विश्वास


Goa Winner List : गोव्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर, वाचा भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी


केजरीवालांच्या 'झाडू'पुढे विरोधक साफ, एकहाती सत्ता, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही धोबीपछाड