साठच्या दशकात पुण्यातले बटाटेवडा (तत्कालीन पुण्यातला उच्चार बटाटवडा )घरातून मोजक्या हॉटेलात आणि हॉटेलातून लवकरच 'रस्त्यावर'आला. त्याकाळी पुण्यात घरगुती चवीचे बटाटवडे डब्यात घेऊन त्याची घरोघरी विक्री करणारे लोक फिरायचे."चार बटाटे उकडून मीठ आलं, लसूण मिरची घालायचे वडे, बाहेरून विकत कश्याला घ्यायला पाहिजेत?" वगैरे म्हणणाऱ्या गृहिणी त्याकाळी पुण्यात होत्या, अश्या आठवणी आता जुने पुणेकर सांगतात. जाणते हा शब्द पुणेकरांच्या बाबतीत वेगळा म्हणायची गरज नसते कारण (आम्हा पुणेकरांच्या मते ) सगळेच पुणेकर, ’जाणते’च जन्माला येतात. पण ते असो !

साधारण सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात, घरातल्या गृहिणींकडून शुद्ध शेंगदाणा वगैरे तेलात तळले जाणारे वडे, काही काळ छोट्या हॉटेलातला प्रवास करून फायनली मळका लेंगा आणि तितकाच मळखाऊ शर्ट घालून 'डालडा' ची कढई सांभाळणाऱ्या हातगाडीवरच्या आचाऱ्याच्या ताब्यात गेले आणि; गंगेत स्नान केल्यावर चांगली माणसंही जशी'पावन' होतात, तसे चविष्ट असलेले वडे खऱ्या अर्थाने खमंगही झाले.

घरात मन मारून गप्प बसवलेला शाळकरी मुलगा, कॉलेजमधे उनाड मित्रांच्या संगतीत गेल्यावर जसा 'टग्या' बनतो; तसे गाडीवर पोहोचलेल्या वड्याच्या मिश्रणात कांदा, लसणीचं प्रमाण वाढलं. कोण्या अनामिक आचाऱ्याने त्याची चव वाढवायला त्या मिश्रणात मसाल्याची भर घातली. त्यात जास्ती मिरच्यांची भर पडून वडे झणझणीत झाले. ‘वैच’’ जास्त तिखट खाणाऱ्यांसाठी तळलेल्या मिरच्या मिठात घोळवून ग्राहकांच्या हातातल्या कागदात पडायला लागल्या.

इथेच खाद्यविश्वात मराठमोळ्या बटाटेवड्याचं ‘मोस्ट पॉप्युलर स्ट्रीट फूड' म्हणून झपाट्याने रूपांतर झालं, ते कायमचंच !

बटाटावडे आणि अमिताभ ह्या दोघात मला प्रचंड साम्य वाटतं ! त्याला कारणंही तशीच आहेत. बघा ना ! दोघांनाही पब्लिक पर्यंत पोहोचायला मोठा स्ट्रगल करायला लागलाय. सुरुवातीला ‘क्रिटिक’ चा प्रचंड सामना करायला लागला आहे. पब्लिकला आवडण्यासाठी स्वतःमध्ये अनेक बदल करायला लागलेत. मार्केटमध्ये आल्यावर 'सेटल' व्हायला दोघांनाही वेळ लागलाय पण एकदा सुपरहिट झाल्यावर दोघांच्याही एंट्रीपासून शेवटपर्यंत मजबूत डिमांड असते.
त्याआधी,त्यानंतर अनेक पदार्थ आले पण अमिताभने 'जंजीर'नंतर जनतेच्या मनावर आजतागायत कब्जा केलेल्या नंबर १ सारखे स्थान बटाटावड्यानेही पटकावलं आहे. तेही फक्त महाराष्ट्रातच नाही तर पुण्यातही ! त्यामुळे पुणेकरांना कोणत्याही कारणावरून दूषणे देण्याची ही संधी, उर्वरित महाराष्ट्रातल्या 'पुणे प्रेमी' प्रजेनी ह्या ठिकाणी तरी गमावली आहे.

तोपर्यंत ‘मैद्याचा पाव’ हा 'सावन भादो' मधल्या रेखायेवढाच दुर्लक्षित होता. पण रेखाला जसा 'रील लाईफ' मध्ये (खरंखोटं देव जाणे, आपल्याला काय करायचय?) अमिताभ लाभला आणि त्यानंतर जसं तिचं वेगळंच स्वरूप लोकांपुढे आलं. वडापाव ह्या जोडीने अमिताभ-रेखा जोडीसारखं कायमच'पब्लिक' च्या मनावर अधिराज्य केलं.पण अमिताभच्या परिसस्पर्शानी बदललेल्या रेखाने जसे जितेंद्र,रणधीर कपूर सारख्या नटांबरोबर काम करून त्यांना जगायला चार पैसे मिळवून दिलं; तसं पावानी डाळीच्या पिठात बुडून स्वतःची 'पाव पॅटीस' म्हंणून ओळख निर्माण केली. (त्याबद्दल पुढे थोडं लिहिलय.)

स्ट्रीट फूड मधल्या आठवणीत असलेले वड्यापैकी एक म्हणजे नव्या पेठेत विठ्ठल मंदिराबाहेर त्याकाळी एकमेव हातगाडी लावणाऱ्या काकांकडचे (त्यांचं आडनाव आता विसरलो पण आपल्या ठेंगण्याश्या मुलाला सोबत घेऊन रोज संध्याकाळी ४ च्या आसपास गाडी लावायचे.साधारण दहाएक वर्षांपूर्वी पर्यंत त्यांचे) वडे हे पुण्यातलया ‘बेस्टेस्ट’ वडयापैकी एक होते. जरा मोठ्या चिरलेल्या कांद्यात तश्याच भरड मिरचीचे तुकडे, लसूण आणि स्वतः तयार केलेला गरम मसाला घालून तळल्यावर त्याला एक वेगळेच 'तैखिट्य' प्राप्त व्हायचे त्याला तोड नव्हती. जरा वेगळ्या पद्धतीचे पण सुरेख चवीचे वडे, आजही कसब्यातल्या वैद्य उपहार गृहाच्या बाहेर, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या गाडीवर मिळतात. आजकाल पुण्यात,कोल्हापुरी स्टाईल मोठ्या'कट'वाल्या वड्याचे ‘पीक’ आले आहे.

मराठमोळा उत्तम साबुदाणे वडा हातगाड्यांवर विकणाऱ्या तर अनेक गाड्यांची नावं घेता येतील. पण वडापावच्या गाड्यांवर पट्टराणी समान विराजमान होतात त्या म्हणजे गोल कांदा भजी, खेकडा भजी. पण त्यांची खरी लज्जत समजते ती फक्त पावसाळ्यात ! आपण कोरड्या ठणठणीत अवस्थेत असताना बाहेर कोसळत असलेला पाऊस डोळे भरून निरखत, कांदा भजी खाण्याच्या सुखाचे वर्णन आपण काय करणार?

बाकी भजीचं पीठ नीट मळलं गेलं नाही त्यामुळे गोल कांदा भजी करता आली नाहीत, ह्या कारणास्तव कोणत्या तरी अनामिक नवशिक्या आचाऱ्या कडून खेकडा भजीचा शोध जाताजाता लागून गेलाय.कालांतरांनी लोकांना तीही आवडायला लागली, हा माझा खेकडा भजीबद्दलचा अंदाज/मत.

‘पावा’ पासून पुढे जमून गेलेल्या स्ट्रीट फूडचा एक वेगळा फॅन क्लब आहे.अश्या जमून आलेल्या पदार्थांमध्ये बहुतेकदा वडापावचेच मिश्रण पावात भरून एकत्र तळलेल्या पाव-पॅटीसचा नंबर, सगळ्यात जुना

फडगेट जवळच्या पानघंटी चौकाच्या अलीकडच्या टपरीवर मिळणारे पाव-पॅटीस छान, त्याहीपेक्षा त्यांची ओली लाल चटणी जास्ती छान असायची. त्याच्यापुढे गेल्यावर कस्तुरे चौकातल्या 'सोनल'चे पॅटीस (भरमार गर्दीतून जर आपला नंबर लागला तर) पुण्यात आजही सर्वोत्तम ठरू शकतील.

रास्ता पेठेत अपोलो टॉकीजजवळ ठक्कर बंधूंनी पुण्यात ८० च्या दशकाच्या शेवटी, गुजराती चवीच्या दाबेलीची पहिली गाडी लावली आणि पावानी जमवलेला अजून एक घरोबा पुणेकरांना समजला. डेक्कनची नटराज, यशवंत ह्या दाबेलीच्या गाड्या त्यानंतर म्हणजे नव्वदच्या दशकात सुरु झाल्या. कच्छी दाबेलीतही नंतर चीज दाबेली आता मेयोनीज दाबेली असे अनेक प्रकार सुरु झाले.

शेव पाव म्हणजे पावाचा ‘लेस्टेस्ट’लोकप्रिय प्रकार.बटरवर भाजलेल्या पावात दोनतीन वेगवेगळ्या प्रकारच्या शेव भरल्या की झाला शेव पाव.त्यावर आपापल्या आवडीने व्हेज (म्हणजे फक्त काकडी,टोमॅटो बरंका)चीज, मेयोनीजचा एकेक चमचा घातला की झाला शेवपाव तयार ! सध्याच्या कॉलेज स्टुडंटमध्ये कमालीचा लोकप्रिय झालेल्या शेवपावच्या गाड्या पुण्यातल्या गल्लीबोळात सुरु झाल्या आहेत, विशेषतः शाळा,कॉलेजेसच्या बाहेर. मला नव्या कर्नाटक शाळेच्यासमोर एका ठिकाणी मिळणारा शेवपाव बरा वाटला. खरंतर वाईट लागावं असं त्यात काही नसतंच.

पावाचा विषय निघालाय आणि ‘अंडा भुर्जी-पावचा उल्लेख केला नाही तर माझ्या हातून पातक घडेल.

अंडा भुर्जी, पावाची ही जोडी 'खिमा-पावा'लाही मत्सर वाटावा अशी. खिमा-पाव ब्रेकफास्ट/ ब्रंच करता परफेक्ट तर; भुर्जीपाव हे खऱ्या अर्थाने अपरात्रीचं खाणं.

पोटात आग पेटलेली असताना,चार हॉटेल्सचे बंद दरवाजे बघून अपरात्री भटकणाऱ्या थकल्या जिवाला (त्याची कारणं न विचारणं जास्ती योग्य) लांबून रॉकेलच्या मिणमिणत्या दिवा लावलेली गाडी दिसल्यावर मनात येणाऱ्या भावनांची तुलना, वाळवंटात ओॲसिस दिसलेल्या व्यक्तीला बरोब्बर करता येईल.

शिवाजीनगर / पुणे स्टेशन, नटराजच्या बाहेर ,डेक्कन कॉर्नरला ,गरवारे कॉलेजच्या बाहेर किंवा गेल्या काही वर्षात नळस्टॉपच्या पुढे कर्वे रस्त्यावर सुरु झालेल्या भुर्जीपावाच्या गाड्या,आमचा दोस्त कम चाचू ,बादशहाच्या ( तो स्वतः अस्सल हैदराबादी बिर्याणीही १ नंबर बनवायचा, सध्या माहिती नाही) प्रिंन्स फोटो स्टुडिओबाहेरची ‘रेश्मा भुर्जी’ ची टपरी ( सुरु झाली बीएमसीसी रोडला ) म्हणजे ‘भुक्कड’ लोकांच्या रात्रीच्या जेवणाची हमखास सोय.

भुर्जीपाव सारख्या गाड्या चालवूनही अस्मादिकांच्या आठवणीत कायम वसलेल्या ,पुण्यातल्या काही व्यक्तींवर पुढच्या ब्लॉगमधे .

क्रमशः

वाचा :  रस्त्यावरचं खाणं पुण्यातलं - थोडा भूतकाळ, थोडं वर्तमान - भाग 1