धुळे : धुळे लोकसभा मतदार संघात मराठा विरुद्ध मराठा अशीच लढत होणार आहे. काँग्रेसचे कुणाल पाटील विरुद्ध भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्यात ही लढत होणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2009 मध्ये 15 व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर आजतागायत भाजपचा झेंडा फडकतोय.
धुळे लोकसभा मतदार संघाविषयी
शुद्ध दुधाचा जिल्हा, धवल क्रांतीचा जिल्हा म्हणून कधी काळी धुळे जिल्ह्याची ओळख होती. मुंबई, दिल्लीतील ग्राहक धुळ्याच्या दुधासाठी वाट पाहत असे. यासाठी त्याकाळी मिल्क ट्रेनच्या माध्यमातून मुंबई, दिल्लीला दुधाच्या वॅगन रवाना होत असे. यासाठी धुळे शहरातील सरकारी दूध डेअरीपर्यंत रेल्वेचे रुळ होते. धुळ्याची ही ओळख आता नामशेष झाली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ
धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील तीन, नाशिक जिल्ह्यातील तीन असे एकूण सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. यात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण तसेच शिंदखेडा या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगांव मध्य, मालेगांव बाह्य तसेच बागलाण या तीन विधानसभा मतदार संघांचा धुळे लोकसभा मतदार संघात समावेश आहे. तर धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर हे दोन विधानसभा मतदार संघ नंदुरबार लोकसभा संघात आहेत.
धुळे लोकसभा मतदार संघात आतापर्यंत भाजप-काँग्रेसमध्ये खरी लढत
धुळे लोकसभा मतदार संघात आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षात खरी लढत झालीय. धुळे लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित होता. मात्र 2009 मध्ये 15 व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर आजतागायत भाजपचा झेंडा फडकतोय.
धुळे लोकसभा मतदार संघातील काही मुख्य समस्या
उद्योग क्षेत्र, दळवळणाचा अभाव, रोजगाराची समस्या, सिंचन क्षेत्र विकासाचा अभाव, शेतकऱ्यांच्या समस्या असो की युवकांच्या समस्या असो, पिण्याच्या पाण्याची समस्या असो, कधी काँग्रेसच सरकार कधी भाजपच सरकार. मात्र समस्या या आजवर 'जैसे थे'च आहे. आजही मुलभूत समस्यांसाठी मतदारांना संघर्ष करावा लागतोय.
धुळे लोकसभा निवडणुकीत विजयासाठी जात हा फॅक्टर यशस्वी होत नाही. या मतदारसंघात मराठा समाज 30 ते 35 टक्के आहे. तर उर्वरित समाजाची संख्या मराठा समाजाच्या तुलनेनं अधिक आहे. त्यामुळे उर्वरित बहुसंख्याकांची नाराजी ओढावून घेण्याचं धाडस चाणाक्ष राजकारणी अथवा त्याचा पक्ष देखील करु शकत नाही. धुळे लोकसभा मतदार संघात नाशिक जिल्ह्यातील बागलाणची मते निर्णायक ठरली आहेत. विकासाच्या मुद्यावरच धुळे लोकसभा मतदार संघाची आजवरची निवडणूक झाली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघातून कोण-कोण खासदार झालेत यावर एक दृष्टीक्षेप
धुळे लोकसभा मतदार संघानं आतापर्यंत 16 खासदार बघितले आहेत. यामध्ये 1957 ते 1962 या कालावधीतील दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन जनसंघाचे उत्तमराव लक्ष्मणराव पाटील हे विजयी झाले. त्यानंतर मात्र काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तिसऱ्या लोकसभा निवडणुकीपासून म्हणजे 1962 पासून पाचव्या लोकसभेपर्यंत म्हणजे 1977 पर्यंत काँग्रेसचे चुडामण आनंदा पाटील हे खासदार राहिले. त्यानंतर सहाव्या लोकसभा निवडणुकीत 1977 ते 1980 या कालावधीत काँग्रेसचेच विजय नवल पाटील विजयी झाले. त्यानंतर 15 वर्ष म्हणजे सातव्या लोकसभा निवडणुकीपासून नवव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे रेशमा मोतीराम भोये हे खासदार राहिले.
दहाव्या लोकसभा निवडणुकीत 1991 ते 1996 या कालावधीत काँग्रेसचे बापू हरी चौरे विजयी झाले. अकराव्या लोकसभा निवडणुकीत 1996 ते 1998 परिवर्तन झालं. भाजपचे साहेबराव सुखराम बागुल हे खासदार झाले. त्यानंतर 1998 ते 1999 या बाराव्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसे धनाजी सीताराम अहिरे हे विजयी झाले. तेराव्या लोकसभा निवडणुकीत 1999 ते 2004 या कालावधीत पुन्हा परिवर्तन होत भाजपचे रामदास रुपला गावित हे खासदार झाले. 2004 ते 2009 या कालावधीत चौदाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बापू हरी चौरे पुन्हा एकदा निवडून आले.
पंधराच्या लोकसभा निवडणुकीत 2009 ते 2014 या कालावधीत भाजपचे प्रताप सोनवणे हे खासदार झाले. त्यानंतर भाजपची ही विजयी पताका सोळाव्या लोकसभा निवडणुकीत 2014 ते 2019 या कालावधीत कायम फडकत राहिली. भाजपचे डॉ. सुभाष रामराव भामरे हे विजयी झाले. विजयाची ही पताका भाजप आता 2019 ते 2024 या सतराव्या लोकसभा निवडणुकीत कायम राखेल का? या विषयी मतदारांमध्ये उत्कंठा आहे.