नवी दिल्ली : काँग्रेसचे ओव्हरसीज अध्यक्ष आणि गांधी परिवाराचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे. मोदींनी काँग्रेसवर पलटवार करत म्हटले आहे की, काँग्रेस नेत्यांनी आता 'पाकिस्तान राष्ट्रीय दिवस' साजरा करण्यास सुरुवात केली आहे.


भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. त्यावरुन मोदींनी पित्रोदा यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केले आहे.

मोदींनी म्हटले आहे की, विरोधकांनी पुन्हा एकदा भारतीय जवानांचा अपमान केला आहे. 130 कोटी भारतीय जनतेने काँग्रेसला जाब विचारायला हवा. मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी एक ट्वीट करत म्हटले आहे की, काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे.


काय म्हणाले होते पित्रोदा?
काही जण भारतात येऊन हल्ले करतात, त्यासाठी तुम्ही संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणार का? असा सवाल विचारत पित्रोदांनी पाकिस्तानची बाजू मांडली आहे. पित्रोदा म्हणाले की, 'मला हल्ल्याविषयी फार माहिती नाही. परंतु असे हल्ले होतच असतात. मुंबईवरदेखील असा हल्ला झाला होता. त्यावेळी आम्हीदेखील (तत्कालीन काँग्रेस सरकार)विमानं पाठवू शकलो असतो. परंतु ते योग्य नाही. तुम्ही (सरकार) असं वागू शकत नाही,'

पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकचे पुरावेदेखील मागितले आहेत. 'नक्की एअर स्ट्राइक झाला आहे का? झाला असेल तर त्या हल्ल्यात कितीजण मारले गेले? हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे,' यावरुन मोदींनी पित्रोदा यांच्यासह काँग्रेसवर टीका केली आहे.