मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांमधलं इनकमिंग-आऊटगोईंग सुरुच आहे. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा स्वगृही परतले आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉनमधील कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवार यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला.
मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे प्रवीण छेडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घरवापसी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घाटकोपरमधून काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिलेले प्रवीण छेडा पराभूत झाले होते. सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या भाजपच्या पराग शाह यांनी छेडा यांचा पराभव केला होता.
भाजपने काल लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करताना ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित केला नव्हता. या जागेवर किरीट सोमय्या विद्यमान खासदार असून युतीतील मित्रपक्ष शिवसेनेचा सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे प्रवीण छेडा हे किरीट सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
कोण आहेत प्रवीण छेडा?
- घाटकोपरमध्ये गुजराती समाजातील वजनदार नेते
- भाजपमध्ये नगरसेवक म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर प्रकाश मेहतांशी असलेल्या वादातून 2012 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश
- 2012 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले
- महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही भूषवले. अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख
- 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रकाश मेहतांकडून पराभूत
- 2017 मध्ये पालिका निवडणुकीत भाजपच्या पराग शाहांकडून पराभूत
- प्रकाश मेहतांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाजपमध्ये घेतल्याचे बोललं जातं आहे
- मुंबईत गुजराती कच्छी समाजाची मोठी संख्या. सौराष्ट्रातील नेत्यांच्या जोडीने कच्छमधील छेडा मताधिक्य वाढवण्यात उपयोगी ठरतील
- काँग्रेसमध्ये पूर्व उपनगरातील छेडांना पश्चिम उपनगरांचा समावेश असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात लढण्यासाठी दबाव येत होता. तसं राजकीय हौतात्म्य पत्करल्यापेक्षा छेडांनी स्वगृही परतणं योग्य मानलं असावं.
संजय काकडेंची काँग्रेसवारी टळली
दुसरीकडे संजय काकडेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. नाराज असलेल्या संजय काकडे यांचं मन वळवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे. पक्षातील पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी सोपवून गिरीश बापट आणि काकडेंमध्ये तह झाला आहे. त्यामुळे संजय काकडे यांची काँग्रेसवारी टळली आहे.
हाती भाजपचा झेंडा, प्रवीण छेडा स्वगृही परतले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2019 01:58 PM (IST)
मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे प्रवीण छेडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घरवापसी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -