मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास बाकी असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर असताना आताच्या घडीची ही मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले आहेत. ही भेट पूर्व नियोजित होती का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, राज्यातील दोन दिग्गज नेत्यांची निकालापूर्वी भेट होत असल्याने त्यांच्यात नेमकी काय खलबतं होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला


देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं गणित पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे महायुती असेल, असं   वारंवार बोललं जात आहे. लोकसभेत मनसेला काही जागा मिळण्याची शक्यता होती. मात्र, नंतर या जागा शिंदे गटाला देण्यात आल्या. आता महायुतीचं गणित लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अबलंबून आहे. 


लोकसभेच्या निकालापूर्वी फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये खलबतं


मनसे विधानसभा निवडणुकीत महायुतीत राहणार की नाही हे सुद्धा लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहे. याशिवाय, आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मुख्यत: भाजपला काही निर्णय मनसे सोबत घ्यावे लागणार आहेत. याआधी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.


नेमकी चर्चा कशावर?


मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपकडून निरंजन डावखरे जे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात, त्यांच्याही उमेदवारीची आज घोषणा झाली आहे. यासंदर्भातही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या चर्चा होऊ शकते. मात्र, प्रामुख्याने लोकसभेच्या निकालावर या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते. ही सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात असलं तरी, लोकसभा निवडणुकीच्या आधीच गणित, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचं गणित, विधान परिषद तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका यावर एकंदर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचीही भेट महत्त्वाची मानली जात आहे.


उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल


लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास बाकी आहेत. उद्या सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. देशासह राज्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नरेंद्र मोदी पुन्हा हॅटट्रीक करणार आणि इंडिया आघाडीची जादू चालणार याचा फैसला काही तासांवर येऊन थांबला आहे. उद्या एबीपी माझावर महानिकालाचं महाकव्हरेज होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून देशभरात मतमोजणीला सुरुवात होणार आहे तर सकाळी 6 वाजेपासून एबीपी माझावर अचूक आणि वेगवान निकाल पाहता येणार आहे.