जालना : देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) निकालाचा दिवस अखेर उजाडला असून प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ते आणि नेतेमंडळी कामाला लागली आहे. दुसरीकडे निवडणूक निकालानंतर मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास बसणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तुर्तास आपला निर्णय बदलला आहे. निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसणार होते. मात्र, अंतरवाली सराटी गावातूनच त्यांना विरोध होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गावातील उपसरपंचांसह 70 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगेंच्या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे म्हटले. त्यानंतर, आता जरांगे यांनी तुर्तास आपले आंदोलन स्थगित केले आहे.
मनोज जरांगे यांच उद्याच उपोषण स्थगित करण्यात आलं असून ते 8 जून रोजी उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे, आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल केले जातील, म्हणून सावध भूमिका घेत जरांगेंनी उद्याचं आंदोलन स्थगित केल्याची माहिती आहे. तसेच, अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळेही हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली होती, पण गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामुळे उद्याचं आंदोलन स्थगित केलं नसल्याचे जरांगे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
जरांगेंच्या आंदोलनास ग्रामस्थांचा विरोध
मनोज जरांगे यांनी 4 जूनपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे, उद्या 4 जूनला मनोज जरांगे उपोषणस्थळी जाऊन पुन्हा उपोषणाला बसतील, अशी चर्चा होती. तत्पूर्वीच, गावकऱ्यांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले आहे. प्रशासनने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, जरांगे यांचं उपोषण वादात सापडल्याचं दिसून येत आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांची जरांगेंवर टीका
मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही वाटचाल पॉलिटीकल स्कोअरिंग करणारी आहे. समाजाचा आधार घेऊन उमेदवाराच्या विरोधात प्रक्षोभ करण्याचा प्रयत्न झाल्याचं चित्र लोकसभा निवडणुकांवेळी दिसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. तसेच, नाव न घेता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर भाष्य करताना टीकाही केली. मराठा समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर होतोय हे आता आमच्या समाजातील तरुणांना समजत आहे. राज्यात 58 मोर्चे निघाले होते, तेंव्हा हे आत्ता आंदोलन करणारे कुणीच नव्हते. आज जे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत, ते कुठे होते?, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आत्ताचे आंदोलन भटकटत चाललं आहे. जनतेच्या हे लक्षात आल्यानेच जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध होतोय, असेही विखे पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा