मुंबई : महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मंत्र्यांना पराभूत करणारे जायंट किलर सध्या चर्चेचे विषय ठरले आहेत. यात खास आकर्षणाचे केंद्र ठरले ते नवनियुक्त आमदार देवेंद्र भुयार. मोर्शी मतदारसंघातून भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत चक्क राज्याच्या कृषीमंत्र्यांचाच पराभव केला. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करणाऱ्या भुयारांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र भुयार यांच्यावर मतदानाच्या दिवशी अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तसेच त्यांची चारचाकी वाहन पेटविली होती. या घटनेमुळे त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते. वरुडमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देवेंद्र भुयार यांनी चळवळीच्या माध्यमातून हे यश मिळवले आहे.  त्यांचे आई वडील हे शेतकरी. भुयार यांच्या या यशाने पश्चिम महाराष्ट्रात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भात चांगले पाय रोवत आहे.

शेतकरी, जनसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला जेरीस आणणाऱ्या युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना 2016 मध्ये दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. भुयार यांच्या राजकारणाची सुरवात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यासोबत झाली होती. या विधानसभेला देखील बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. भुयार अनेक आंदोलनासाठी चर्चेत राहिले.  प्रहारमधून पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास झाल्यानंतर आता ते जायंट किलर ठरून आमदार झाले आहे.

देवेंद्र भुयार आमदार झाल्यानंतर स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भावनिक पोस्ट लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेट्टी यांनी म्हटलं आहे की, आज पुन्हा मला 2004 सालातील आठवणींची पुनरावृत्ती झाली. 1988 सालापासून मी शेतकरी चळवळीला सुरवात केली. 'मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया' याप्रमाणे चळवळीला उभारी मिळत गेली. 1996 साली स्वर्गीय शरद जोशी यांचे मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने यशस्वी होऊ लागली. यामुळे 2002 साली मी सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील उदगाव जिल्हा परिषद मधून निवडणूक लढविली. या चळवळीच्या जोरावर मी उदगांव जिल्हा परिषद मधून जिल्हा परिषदेचा सदस्य झालो. दिड एकर जमीन असलेला मी अल्पभूधारक शेतकरी याच चळवळीच्या जोरावर 2004 साली मी विधानसभेचा सदस्य झालो. 'एक व्होट व एक नोट' यापध्दतीने राज्यात निवडणुकीत आदर्श निर्माण करत चांगल्या मताधिक्याने निवडून आलो, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.



आज तब्बल 15 वर्षांनी तसाच अनुभव देवेंद्र भुयार यांच्या बाबतीत आला. वयाच्या 23 व्या वर्षापासून चळवळीचे वेड लागलेला अल्पभूधारक कुटुंबातील देवेंद्रही शेतकरी आंदोलनातून 2012 साली पंचायत समिती सदस्य व 2017 साली जिल्हा परिषद सदस्य झाला. घरावर तुळशीपत्र ठेवून अत्यंत आक्रमकपणे शेतकरी आंदोलनात स्वत:ला झोकून देऊन काम केल्याने वरूड मोर्शी विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक घटकातील, पक्षातील , समाजातील माणूस एकवटून देवेंद्र भुयारांना 'एक व्होट व एक नोट' यापध्तीने लोकांनी राज्याच्या कृषीमंत्र्याच्या विरोधात मताधिक्याने निवडून दिले. देवेंद्रच्या विजयानिमित्त आज तरूणाईमध्ये जो उस्फुर्त जल्लोष व प्रतिसाद पाहिल्यांनतर निश्चितच विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व चळवळीचे बळ वाढविण्यासाठी विदर्भातील 'रेशीमबागेपासून' जनतेने दिलेला हा कौल निश्चितच चळवळीला दिशा देणारा आहे हे नक्की.

आजचा हा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या देवेंद्रकडून इतकीच अपेक्षा की 'दुर्बिणीने शोधून सुध्दा हाताला कोणताही डाग लावून न घेता, तू या चळवळीला बळ दे', असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.