चंद्रपूर : बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या माऊलीचा लेक झाला आमदार झाला आहे. लेकाचा बहुमान पाहून आईला अश्रू अनावर झाले. यावेळी आपल्या गळ्यातील सर्व हार आईच्या गळ्यात घालून लेक आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला विजय आईला समर्पित केला.  हे चित्र पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.


चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार हे भाजप आमदाराला पराभूत करून तब्बल 73 हजार मतांच्या फरकाने निवडून आले. साहजिकच लोकांनी किशोर जोरगेवार यांना प्रचंड हार तुरे घालून त्यांचा सत्कार केला. आपल्या लेकाचा हा बहुमान पाहून त्यांच्या आईचा उर भरून आला आणि त्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या आईचे हे या अश्रू पाहून जोरगेवार देखील भावूक झाले. त्यांनी आपल्या गळ्यातील सर्व हार आईच्या गळ्यात घालून आपला विजय आपल्या आईला समर्पित केला. हे दृश्य पाहून त्या ठिकाणी उपस्थित अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

विशेष म्हणजे दलित समाजातील किशोर जोरगेवार हे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करून आमदार झाले आहे. किशोर जोरगेवार यांची आई आज देखील चंद्रपूर शहरातील गांधी चौकात रस्त्याच्या कडेला बसून बांबूच्या टोपल्या विकते. कदाचित या संघर्षामुळेच त्यांना आपल्या लेकाचा झालेला बहुमान पाहून अश्रू थांबविता आले नाही.

किशोर जोरगेवार यांनी 75 हजार मतांनी विजय प्राप्त केला. सुरुवातीला किशोर जोरगेवार भाजपात होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितले. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकाची 51 हजार मते त्यांना मिळाली होती. आताच्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र, कॉंग्रेसनेही त्यांना नाकारले. त्यामुळे अपक्ष म्हणून ते रिंगणात होते.

शोभाताई फडणवीसांनी घेतली जोरगेवारांची भेट
राज्यातील सत्तास्थापनेसाठी अपक्षांचे स्थान महत्वाचे असणार आहे. याचमुळे भाजपने अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. आज चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भेटीला शोभाताई फडणवीस पोचल्या. शोभाताई या  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत. शोभाताईंनी जोरगेवार यांच्या भाजप तिकिटासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. जोरगेवार यांच्याशी भेट विजयासाठी अभिनंदन करण्यासाठी असल्याचे शोभाताईंनी सांगितले आहे.

हे ही वाचा-  चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ : स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा वाद निर्णायक!