Punjab Election 2022: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरुन विविध चर्चा सुरू आहेत. पंजाबमध्ये विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत चरणजीत सिंह चन्नी आणि नवज्योत सिंह सिद्धू या दोघांशी देखील आज चर्चा केली. या दोघांनी सांगितले की, पंजाबमध्ये काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दोघांनी सांगितले की जो कोणी पंजाबचे नेतृत्व करेल, त्याला सर्व शक्तीने मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रसचे कार्यकर्ते  आणि पंजाबची जनता जर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यास सांगत असेल तर आपण कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ असेही राहुल गांधी म्हणाले. येत्या 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर 10 मार्चला मतमोजणी पार पडणार आहे. 


एका सर्वेनुसार पंजाबमध्ये काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी या प्रश्नावर 40 टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाला पसंती दिली आहे. चन्नी यांच्या नेतृत्वातच पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवावी असे लोकांचे म्हणणे आहे. तर 21 टक्के लोकांनी सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली आहे. सिद्धू यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली पाहिजे असे 21 टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर 27 टक्के लोकांनी दोघांच्याही नावाला नकार दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी याबाबत माहित नसल्याचे उत्तर दिले आहे. दोन्ही नेते मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नाबाबत विचारल्यावर टाळाटाळ करत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी एबीपी न्यूजशी बोलताना नवज्योत सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्या नशीबात जे लिहले आहे ते कोणीच हिरावू शकत नाही. मी कायम पंजाबच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: