Air India Tata : भारत सरकारची विमान कंपनी असलेली एअर इंडिया (Air India) आतापासून टाटा समूहातंर्गत उड्डाण भरणार आहे. आज म्हणजेच 27 जानेवीर, 2022 रोजीपासून अधिकृतरित्या एअर इंडियाचे अधिकार टाटा समुहाकडे आले असून याच पार्श्वभूमीवर टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीचा फोटो पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन शेअर देखील करण्यात आला आहे.



केंद्र सरकारने तोट्यात असणाऱ्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एअर इंडियासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. केंद्र सरकारने निविदा प्रक्रियेनंतर 8 ऑक्टोबर 2021 रोजी 18 हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाच्या 'टॅलेस प्राइव्हेट लिमिटेड कंपनी'ला एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर आता एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली असून आजपासून टाटा समूह एअर इंडियामध्ये आपली सेवा सुरू करणार आहे. दरम्यान या वेळी चंद्रशेखरन यांनी या करारामुळे आम्ही फार आनंदी असून एअर इंडियाला एक 'वर्ल्डक्लास' एअरलाईन्स बनवण्याचा आमचा निर्धार असल्याचं सांगितलं.


स्टेट बँकेचाही पाठिंबा


या मुलाखतीनंतर भारतातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देखील या कराराबाबत समाधान व्यक्त करत एअर इंडियाला व्यवसायासाठी जे काही वर्किंग कॅपिटल अर्थात आर्थिक मदत लागेल ती करण्यासाठी स्टेट बँक कायम मदतीसाठी असेल असं वक्तव्य करण्यात आलं आहे. 


प्रवाशांना नवनवीन सुविधा मिळणार


एअर इंडियाकडे राज्यस्तरीय तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासीमार्गांवर महत्त्वपूर्ण विमानसेवा आहे. त्यात आता नवी मॅनेंजमेंट आल्यानंतर राज्यस्तरीय तसंच आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना बऱ्याच सोयी-सुविधा मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. टाटा ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार सुरवातीच्या 5 फ्लाइट्समध्ये कंपनी मोफन जेवण उपलब्ध करणार आहे. सध्या मोफत जेवण मिळणाऱ्या फ्लाईट्समध्ये मुंबई ते दिल्लीच्या दोन फ्लाइट्स (AI864 आणि AI687) मुंबई ते अबूधाबी (AI945) आणि मुंबई ते बंगळुरु (AI639) यांच्यासह मुंबई ते न्यूयॉर्क या फ्लाइट्सचा समावेश आहे. टाटा ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार मोफत जेवणाची सेवा पुढे जाऊन टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha