Punjab Election 2022: सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका लागल्या आहेत. यामुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. पंजाबमध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, काँग्रेसने पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केला नाही. काँग्रेसकडून सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा? कोणाच्या नेतृत्वात काँग्रसने निवडणूक लढवावी, यासाठी पंजाबमध्ये सी वोटरने एक सर्वे केला आहे. 


पंजाबमध्ये काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी या प्रश्नावर 40 टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाला पसंती दिली आहे. चन्नी यांच्या नेतृत्वातच पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवावी असे लोकांचे म्हणणे आहे. तर 21 टक्के लोकांनी सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली आहे. सिद्धू यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली पाहिजे असे 21 टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर 27 टक्के लोकांनी दोघांच्याही नावाला नकार दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी याबाबत माहित नसल्याचे उत्तर दिले आहे. 


काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी


चरणजीत सिंह चन्नी - 40 टक्के
सिद्धू - 21 टक्के
दोन्ही नको - 27 टक्के
माहित नाही - 12 टक्के


दरम्यान, दोन्ही नेते मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नाबाबत विचारल्यावर टाळाटाळ करत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी एबीपी न्यूजशी बोलताना नवज्योत सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्या नशीबात जे लिहले आहे ते कोणीच हिरावू शकत नाही. मी कायम पंजाबच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पंजाब विधानसभेसाठी 20 फेब्रुवारीसाठी मतदान होणार आहे. तर  10 मार्चला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला आम आदमी पार्टी (आप), शिरोमणी अकाली दल (शिअद) और भाजप-पंजाब लोक काँग्रेस या पक्षांचा सामना करावा लागणार आहे. आम आदमी पार्टीने भगवंत मान यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अकाली दलाने सुखबीर बादल यांना पुढे केले आहे.