Bunty Shelke नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्यातील वाद आता फुटपाथ पर्यंत पोहोचला आहे. नागपूर शहर काँग्रेस कार्यालयाला नाना पटोले यांच्या सांगण्यावरून कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठीची बैठक फुटपाथवर घ्यावी लागत असल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला आहे.
नाना पटोलेंमुळे संपूर्ण काँग्रेस पक्षालाच कुलूप- बंटी शेळके
शहर काँग्रेसचे कार्यालय असलेल्या देवडिया काँग्रेस भवनात आज दुपारी बंटी शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीची बैठक बोलावली होती. मात्र नियोजित वेळी कार्यालयाला कुलूप दिसून आले. त्यानंतर बंटी शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या समोर रस्त्यावर आणि फुटपाथवर बसून बैठक पार पाडली. नाना पटोले यांच्या सांगण्यावरूनच कार्यालयाला कुलूप लावण्यात आले असून नाना पटोले यांनी संपूर्ण काँग्रेस पक्षालाच कुलूप लावल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला आहे.
एवढंच नाही तर नाना पटोले यांनी साकोलीची निवडणूक देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत फिक्स केली. तिथे स्वतःचा निसटता विजय सुनिश्चित करून नाना पटोले यांनी राज्यात इतरत्र काँग्रेसला पराभूत केल्याचा गंभीर आरोप ही बंटी शेळके यांनी केला आहे. त्यामुळे नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता थेट फुटपाथपर्यंत आल्याचे बघायला मिळतो आहे.
पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत द्वंद्व?
विधानसभा निवडणूकमध्ये काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत द्वंद्व सुरु झाले आहे का? आणि पक्षातील नाना पटोले विरोधी गटाने त्यासाठी नागपूर मध्य मतदारसंघातील पराभूत काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांना आपले मोहरा बनविला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे कारण म्हणजे नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहेत, असा गंभीर आरोप केल्यानंतर बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
श्रेष्ठींपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी नाना पटोले दिल्लीत
दरम्यान, बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्या विरोधात मोहीम उघडी असली, तरी राजकीय दृष्ट्या ते एकटे नाहीत. त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील नाना पटोले विरोधी काँग्रेस गट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच नाना पटोले ही पक्ष श्रेष्ठींपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत पोहोचल्याची माहिती आहे. आता बंटीच्या माध्यमातून नानांवर हल्लाबोल करण्याचे हे प्रयत्न काँग्रेमध्ये नव्या वादाचे कारण बनते की, याच्यातून पराभूत झालेल्या काँग्रेसमध्ये खरंच सकारात्मक मंथनाला सुरुवात होऊन काँग्रेसचा काही भले होतं, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.
हे ही वाचा