मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची काल राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5543 उमेदवारांपैकी 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने 798 उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील आणि अर्जुन खोतकर यांना देखील दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचा गड असलेल्या चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे तक कुर्ल्यात देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला झटका बसला आहे. तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला.


देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आलाय. प्रतिज्ञापत्रावरील नोटरीच्या मुदतीबाबत विरोधकांनी घेतलेला आक्षेप  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर केलेल्या नोटरीची मुदत संपल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित नोटरीला पाच वर्षे मुदतवाढ दिली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने विरोधकांचा दावा मोडीत काढला. फडणवीसांचा अर्ज स्वीकृत केला गेला.

विखे पाटील, खोतकरांना दिलासा
राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्जही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवला आहे. प्रतिज्ञापत्रावरील नोटरीची मुदत संपल्याचा आक्षेप काँग्रेसच्या उमेदवारानं घेतला होता. हरकतीवर झालेल्या सुनावणीनंतर विखेंचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. दुसरीकडे जालन्याचे शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर यांनाही निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलासा दिला आहे. तर कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज देखील अवैध ठरवण्यात आला आहे.  शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी सामंतांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता.

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची वाताहत
चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. छाननीमध्ये अर्जात त्रुटी आढळल्याचं निदर्शनास आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आधीच भोसरीमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही तर पिंपरीत ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की आली आणि त्यातच चिंचवडच्या उमेदवाराचा आता अर्ज बाद झाल्याने बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची वाताहत सुरू आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 71 अर्ज बाद झाले आहेत, तर 373 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. एकूण मतदारसंघात सर्वाधिक अर्ज दाखल केलेल्या कँटोन्मेंट मतदारसंघात सर्वाधिक 27 अर्ज अवैध ठरले आहेत, तर शिवाजीनगर, खडकवासला आणि खेड-आळंदी या मतदारसंघात कोणताही अर्ज अवैध ठरला नाही.

नागपुरात 28  उमेदवारांचे अर्ज अवैध
नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघात एकूण 205 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एकूण 28 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यात राजकीय पक्षांतील उमेदवारांचाही समावेश आहे. नागपूर पश्चिम मतदार संघातून सर्वाधिक पाच उमेदवारांचे अर्ज रद्द झाले असून येथे आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात नसेल.

राष्ट्रवादीचा एक उमेदवार शक्तीप्रदर्शनात गुंग, दुसऱ्याने स्वप्न केलं भंग
कुर्ला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला धक्का दिला आहे. उमेदवारी अर्जावरुन मोठा ड्रामा याठिकाणी पाहायला मिळाला. हाजिर तो वजीर, यानुसार कुर्ला मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मिलिंद कांबळे यांनी बाजी मारली आहे. कुर्ला मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून जोत्स्ना जाधव आणि मिलिंद कांबळे हे दोन उमेदवार इच्छुक होते. पक्षाने दोघांनाही एबी फॉर्म दिले होते. जोत्स्ना जाधव यांनी मोठा गाजा-वाजा करत, शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात निघाल्या. त्यांचा हाच उत्साह त्यांना महागात पडला आहे. जोत्स्ना शक्तिप्रदर्शनात गुंग राहिल्या तर  मिलिंद कांबळे यांनी सुमडीत आपला अर्ज  दाखल करत बाजी मारली.

औरंगाबाद मध्य मध्ये पाच उमेदवारांचे अर्ज बाद
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून शनिवारी झालेल्या अर्ज छाननीत चार उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. त्यानंतर आता 23 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज छाननीमध्ये सतीश पाटील, भानुदास भालेराव, शेख रशीद शेख महेबूब, अक्षय पाटील यांचे अर्ज बाद झाले.

औरंगाबाद पूर्वमध्ये दहा उमेदवारांचे अर्ज बाद

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्जाच्या छाननीत एकूण दहा जणांचे अर्ज बाद झाले. या पैकी सहा उमेदवारांना निवडणूक रिंगणाबाहेर जावे लागले आहे. 'एमआयएम' उमेदवाराने भाजप उमेदवार अतुल सावे यांच्या अर्जाबाबत घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. छाननीत  पुष्पा जाधव (आंबेडकर नॅशनल क्राँग्रेस), मोहसीन अहमद बशीर अहमद (अपक्ष), अफसर अब्दुल पठाण (अपक्ष), अंकुश देवरे (अपक्ष), जिब्रान कादरी सय्यद तसेच जयप्रकाश घोरपडे यांच्यासह दहा जणांचे अर्ज बाद झाले आहेत.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का  
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी छाननीत बाद झाला. गुन्ह्यांचा कॉलम रिकामा सोडल्याने हा अर्ज बाद झाल्याची माहिती आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांचा एक अर्ज अपक्ष म्हणून तर दुसरा काँग्रेस उमेदवार म्हणून होता, मात्र हे दोन्ही अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. रमेश गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक गटाचे आहेत. काँग्रेस नेत्यांना दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी आधी अपक्ष म्हणून आणि नंतर काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.

सोलापुरात कोणत्याही प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद नाही
सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण कोणत्याही प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झालेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकूण 374 अर्ज दाखल झाले होते. शनिवारी छाननीत 137 जणांचे अर्ज बाद झाले असून 237 अर्ज शिल्लक वैध ठरले आहेत.
पालघर जिल्ह्यात 80 पैकी 11 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अवैध


विधानसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघातील 80 उमेदवारांपैकी 69 उमेदवारांची  नामनिर्देशन पत्र वैद्य ठरली  आहेत. तर 11 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत.


राज्यात 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध
छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 36 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 56 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 75 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 101 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 60 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 151 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 59 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 181 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 66 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 71 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 90 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 125  उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 327 उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 54 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 81 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 133 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 208 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 212 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 69 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 251 उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात 25 मतदारसंघात 272 उमेदवार (वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशीरापर्यंत अप्राप्त), मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 84 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 112 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 372 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 182  उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 202 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 120 उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4  मतदारसंघात 82 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 237 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 108 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 40 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 27 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 186 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 111 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.