मुंबई : एमआयएमचे राज्यातील एकमेव खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात सहभागी झाले होते. इम्तियाज जलील यांनी एमआयएमची पुढील वाटचाल, वंचितसोबतची युती का तुटली?, तिहेरी तलाक अशा अनेक राजकीय प्रश्नांची उत्तर मनमोकळेपणाने दिली.


वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडून लोकांना खुप अपेक्षा आहे. आमची युती झाली असती तर या निवडणुकीत आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला असता, असा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमला चांगली मतं मिळाली होती. मात्र आमची युती तुटली हे दुर्दैव आहे. मात्र 2014 विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं होतं. सध्या एमआयएमची ताकद राज्यात वाढली आहे. मात्र तरीही जागावाटपात आम्हाला कमी जागा मिळण्याची  शक्यता होती, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.



औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरही इम्जियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबाद शहराची जी दुर्दशा झाली आहे, त्या शहराला तुम्ही आज संभाजी महाराजांचं नाव देऊ इच्छिता, ते शोभतंय का? औरंगाबाद शहर ज्यावेळी चकाचक होईल, शहरातील कचरा कमी होईल त्यावेळी मी स्वत: शहराचं नाव संभाजीनगर करुया असं सांगेल, असंही इम्तिजाय जलील यांनी म्हटलं. मात्र औरंगाबादचा विकास करणे हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे. शहरांचं नामांतरं हे महत्त्वाचे मुद्दे नाहीत. असे मुद्दे कुणालाही पटतं नाहीत, असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कायक्रमात सहभागी होण्यास मला काहीच अडचण नाही. मात्र मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही, तर मी देशभक्त नाही, असं होत नाही. मी त्यादिवशी कामानिमित्त बाहेर होतो म्हणून कार्यक्रमाला जाऊ शकलो नव्हतो. मात्र महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याऐवजी अशा मुद्द्यांचा बाऊ केला जातो.  पुढील वर्षी 17 सप्टेंबर 2020 मधील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला आम्ही जाणार आहोत. त्यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री जरी त्या कार्यक्रमाला आले तरी, त्यादिवशी इम्तियाज जलील कार्यक्रमाला गेले ही बातमी होणार असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.


तिहेरी तलाक विधेयकावरही इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका मांडली. जोपर्यंत तिहेरी तलाकवर प्रबोधन केलं जात नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. तिहेरी तलाकचं आम्ही समर्थन करतो हा गैरसमज पसरवला जात आहे. मात्र हा मुद्दा चुकीच्या पद्धतीने समोर आणला जातो, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.