मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून रामराम ठोकणाऱ्या उर्मिला मातोंडकरांची पुन्हा काँग्रेला आठवण झाली आहे. उर्मिला मातोंडकरांनी विधानसभेच्या प्रचाराला यावं यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्वत: उर्मिला मातोंडकरांशी संपर्क साधला आहे. त्यांनी मातोंडकरांना विधानसभाच्या प्रचाराला येण्याची गळ घातली आहे. यासदंर्भात दोन दिवसांत उर्मिला मातोंडकर आपला निर्णय कळवणार असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबई शहर काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप तिने यापूर्वीच केला होता. त्यामुळे आता उर्मिला पुन्हा काँग्रेसच्या स्टेजवर दिसणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Congress | काँग्रेसला उर्मिला मातोंडकरांची आठवण, विधानसभेच्या प्रचाराला येण्यासाठी साकडं | ABP Majha



अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

पक्षांतर्गत गट-तट आणि राजकारण यांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं उर्मिला त्यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटलं होतं. उर्मिला मातोंडकरने या वर्षी 27 मार्च रोजी नवी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पक्षप्रवेशादरम्यान तिने तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेटही घेतली होती. आपण काँग्रेसच्या विचारधारेला मानतो आणि फक्त निवडणुकीपुरता पक्षात आलेलो नाही, असंही तिनं पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. परंतु सहा महिन्याच्या आतच पक्षातील गटबाजीला कंटाळून तिने काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला होता.

"16 मे रोजी लिहिलेल्या पत्रावर कारवाई झाली नाही. ज्यांच्याविरोधात तक्रारी केल्या, त्यांना पदं मिळाली. कोणी मला वापरु नये, यासाठी पक्षाचा राजीनामा देत आहे," असं तिने प्रसिद्धी पत्रात म्हटलं होतं. तसंच लोकांसाठी काम करत राहणार असल्याचंही स्पष्ट केलं.

मुंबई काँग्रेससाठी मोठ्या उद्दिष्टांकरता काम करण्याऐवजी पक्षातल्या अंतर्गत स्वार्थी प्रवृत्ती आणि त्यांच्यातल्या लढायांसाठी माझा वापर करु देणं माझ्या राजकीय आणि सामाजिक जाणीवांना मान्य नाही," असंही उर्मिलाने निवेदनात म्हटलं होतं.

उर्मिलाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याशी लढत दिली होती. बॉलिवूड सेलेब्रिटी, उत्तम वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व असूनही उर्मिलाला गोपाळ शेट्टींना मात्र मात देता आली नाही. शेट्टींना 7 लाख 6 हजार तर उर्मिलाला 2 लाख 41 हजार मतं मिळाली होती.
संबंधित बातम्या