चारकोप विधानसभा मतदारसंघातून भाजपचे योगेश सागर हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या चारकोप मध्ये आता भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत आहे आणि याचे श्रेय जाते योगेश सागर यांना. 2009 च्या निवडणुकीत योगेश सागर यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार भरत पारिख यांचा पराभव करत चारकोप विधानसभेवर भाजपचं कमळ फुलवलं. त्यावेळी योगेश सागर यांना 58 हजार 687 मते मिळाली होती.
2014 ला मोदी लाटेमुळे योगेश सागर यांच्या मतांच्या टक्केवारीत 14 टक्क्यांनी वाढ झाली. एकून मतदानापैकी 60 टक्के मतदान हे योगेश सागर यांना झालं. 2014 च्या निवडणुकीत योगेश सागर यांनी शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांचा पराभव केला. 2014 ला सेना आणि भाजपची युती तुटली तेव्हा शुभदा गुडेकर या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून चारकोप विधानसभेतून उभ्या राहिल्या. परंतु त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं. त्यांना 31 हजार 730 मतं मिळाली टक्केवारीनुसार त्यांना केवळ 19.87 टक्के मतदान झालं.
चारकोपची भौगोलिक परिस्थिती.
चारकोपमध्ये चाकरमानी मोठ्या प्रमाणात राहतात. चारकोपची ओळख म्हणजे चाळी आणि इमारतींचे मिश्रण. चारकोपचा मोठा भाग चाळींनी व्यापलेला आहे. भविष्यामध्ये आपल्याला त्याचे बदललेले स्वरूप पाहायला मिळणार आहे. मेट्रोचे कामही सध्या चारकोपमध्ये सुरु आहे. यामुळे सध्या पार्किंग आणि ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
चारकोपमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार हे मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या योगेश सागर यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.
चारकोप विधानसभेतून कोण असतील विरोधक?
काँग्रेसचे भरत पारिख यांचेच नाव सध्या चर्चेत आहे. तर मनसेकडून दिनेश साळवी चारकोप विधानसभेतून इच्छूक उमेदवार आहेत. शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेनेकडून शुभदा गुडेकर यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते.
चारकोप विधानसभा योगेश सागर यांच्यासाठी किती सुरक्षित?
2009 योगेश सागर पहिल्यांदाच चारकोप विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि गेली दहा वर्ष चारकोप विधानसभेवर भाजपचं कमळ फुलत आहे. योगेश सागर यांच्या कामाची पोचपावती म्हणून फडणवीस सरकारमध्ये त्यांना राज्य गृहनिर्माण मंत्रीपद देण्यात आलं. योगेश सागर यांच्याव्यतिरिक्त भाजपचं कुठलंच नाव या विधानसभेमधून चर्चेत नाही. त्यामुळे भाजपकडून योगेश सागर पुन्हा उमेदवार असतील असं चित्र जवळपास दिसत आहे.
चारकोप मधील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी.
2009
भाजप - योगेश सागर - 58,687 मतं
काँग्रेस - भरत पारेख - 42,324 मतं
मनसे - दीपक देसाई - 23,268 मतं
2014
भाजप - योगेश सागर - 96,097 मतं
शिवसेना - शुभदा गुडेकर - 32,730 मतं
काँग्रेस - भरत पारेख - 21,733 मतं
चारकोप विधानसभा मतदारसंघ | भाजपचे योगेश सागर विजयाची हॅटट्रिक करणार का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2019 01:16 PM (IST)
चारकोपमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार हे मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या योगेश सागर यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -