धुळे : धुळे महापालिका महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपतर्फे महापौरपदासाठी चंद्रकांत मधुकर सोनार, तर उपमहापौरपदासाठी कल्याणी सतीश अंपळकर यांनी नामनिर्देशन दाखल केलं. चंद्रकांत सोनार हे पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी आहेत.


धुळे महापालिकेत 50 जागा मिळवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असल्याने महापौरपदी चंद्रकांत मधुकर सोनार, उपमहापौरपदी कल्याणी सतीश अंपळकर यांची निवड निश्चित झाली आहे. आता केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी राहिली आहे.

महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे  खान सद्दीन हुसेन रहेमतुल्लाह यांनी तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मंगल अर्जुन चौधरी यांनी नामनिर्देशन दाखल केलं आहे.

पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला करणारा देवा सोनार विजयी

धुळे महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीसाठी 31 डिसेंबर रोजी बोलावण्यात आलेल्या विशेष महासभेत महापौरपदी भाजपचे प्रभाग क्रमांक 9 (क) चे नगरसेवक चंद्रकांत मधुकर सोनार, उपमहापौरपदी भाजपच्या प्रभाग क्रमांक 14 (क) च्या नगरसेविका कल्याणी सतीश अंपळकर या दोघांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल.

चंद्रकांत मधुकर सोनार यांच्यासह त्यांचा मुलगा देवा सोनार या दोघांनी 26 मार्च 2013 रोजी होळीच्या दिवशी तत्कालीन एपीआय धनंजय पाटील यांच्यावर जुने धुळे भागात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.