लातूर : नोकरी देण्याच्या बहाण्याने लातूरमधील तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीचं भाजप कनेक्शन समोर आलं आहे. तरुणांना गंडवणारा जितेंद्र भोसले हा भाजपच्या मागासवर्गीय सेलचा नवी मुंबईचा महामंत्री असल्याचं उघड झालं आहे.


धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या तपासात आघाडी सरकारमधला एक माजी मंत्री आणि विद्यमान आरोग्य विभागातील संचालकांची नावंही समोर आली आहेत. महाराष्ट्र, गुजरातसह तीन राज्यांतील युवकांना भोसलेने गंडा घातल्याचा आरोप आहे.

जितेंद्र भोसले हा नवी मुंबईच्या उलवे भागातील रहिवासी होता. त्याच्यावर सीबीडी, एनआरआय, एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एवढंच नाही तर या भामट्यावर गुजरात, कोल्हापूर, लातूर आणि पुण्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्रातील वैद्यकीय खाते आणि मेडिकल कॉलेजमध्ये 774 जागा भरायच्या आहेत, असं सांगून भोसलेने प्रत्येकी दोन ते आठ लाख रुपये उकळले आहेत. त्याने राज्य आरोग्य विभागाच्या नावाने फेक वेबसाईट तयार केली होती. त्यावर तरुणांची निवड झाल्याची लिस्ट लावून त्यांना बनावट नियुक्तीची पत्रे दिल्याची तक्रार मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात दाखल आहे.

सावजांना हेरताना लवाजमा, गाड्यांवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड 

जितेंद्र भोसले याचा मुंबईत बीअर बार असल्याची माहिती आहे. हा आपल्या सावजांना हेरताना पॉश गाड्या घेऊन येत होता. गाड्यांवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड देखील लावायचा. तसेच सोबतीला पीए, सुरक्षा रक्षक असा लवाजमा देखील असायचा. शहरातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये तो उतरत असे. यामुळे सावज आपोआप त्याच्या जाळ्यात सापडायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी जितेंद्र ससून हॉस्पिटलमध्ये नवीन उमेदवाराच्या मुलाखती घ्यायचा. असेच प्रकार त्याने परभणी, गंगाखेड आणि मुंबईच्या ग्रामीण भागात देखील केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात जितेंद्रला मदत करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.