Chandrababu Naidu TDP NDA : लोकसभा निवडणूक निकालानंतर देशात आता आघाडीचे राज्य येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात आता नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जनता दल युनायटेड (JDU) आणि चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या तेलगू देसम पक्षाला (TDP) महत्त्व आले आहे. आता तेलगू देसम पक्षाने भाजपला पाठिंबा देण्यासाठी काही अटी ठेवल्याचे वृत्त समोर आले आहे.


इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीने तेलगू देसम पक्षातील आपल्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. तेलगू देसम पक्ष भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या आघाडीत सहभागी होण्यास तयार आहे. मात्र, त्यांनी काही अटी ठेवल्याचे वृत्त आहे. यामध्ये तेलगू देसम पक्षाने काही महत्त्वाच्या खात्यांचा पदभार मागितला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, भाजपकडून आता मित्रपक्षांना कोणती खाती दिली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


>> तेलगू देसम पक्षाने कोणती मागणी केली?


- तेलगू देसम पक्षाने भाजपकडे लोकसभेचे अध्यक्षपद मागितले आहे. लोकसभेच्या मागील दोन टर्ममध्ये स्वबळावर बहुमत गाठलेल्या भाजपने लोकसभेचे अध्यक्षपद मित्रपक्षांना न देता स्वत:कडे ठेवले होते. त्याशिवाय, लोकसभेचे उपाध्यक्षपद रिक्त ठेवले होते. पक्षांतरबंदीच्या प्रकरणात लोकसभा अध्यक्षांची भूमिका कळीची ठरत असल्याने लोकसभा अध्यक्षपदावर आता तेलगू देसमने दावा केला असल्याचे म्हटले जात आहे. 


>> कोणता खात्यांची केली मागणी?


सूत्रांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या माहितीनुसार, तेलगू देसमने काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे. यामध्ये तेलगू देसमने रस्ते वाहतूक, आरोग्य खाते,  ग्रामविकास खाते, कृषी, माहिती-तंत्रज्ञान खाते, शिक्षण मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय आदी खात्यांसह केंद्रीय अर्थराज्य मंत्रीपदाची मागणी तेलगू देसमने केली असल्याचे वृत्त आहे. 


>> वाजपेयींच्या काळात मित्रपक्षांना मान, मोदींकडून दुर्लक्ष?


अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रात भाजपची सत्ता असताना लोकसभेचे अध्यक्षपद हे मित्रपक्षांना देण्यात आले होते.  तेलगू देसम पक्षाचे जीएमसी बालयोगी, शिवसेनेचे मनोहर जोशी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर मित्रपक्षांना अध्यक्षपद देण्यात आले नव्हते. त्याशिवाय, लोकसभेच्या उपाध्यक्षपदी देखील निवड करण्यात आली नव्हती. लोकसभेच्या उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षांकडे देण्यात येते. 


लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल


भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1



महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8