Parbhani loksabha Election News : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Loksabha Election) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचा प्रभाव असल्याचं बोललं जात आहे. मात्र, परभणी लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (mahadev jankar) विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय जाधव (Sanjay Jadhav) हा सामना झाला होता. या  सामन्यात संजय जाधव यांनी बाजी मारली आहे. मात्र, मराठा आरक्षणाचे केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) महादेव जानकर यांना लीड असल्याचे समोर आलं आहे. कालच्या मतमोजणीत जानकर यांना अंतरवाली सरटीत 98 मतांची लीड आहे.


दरम्यान, अंतरवाली सराटीमध्ये एकूण 1160 एवढं मतदान झालं होतं. यापैकी विद्यमान खासदार संजय जाधव यांना 531 एवढी मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 629 एवढी मतं मिळाली आहेत. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलन स्थळी ओबीसी उमेदवार असणाऱ्या महादेव जाणकरांना 98 मतांची आघाडी मिळाली आहे.


2 लाखांच्या फरकाने विजयी होण्याचा विश्वास जानकरांनी व्यक्त केला होता


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माझा लहान भाऊ म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या हाती शिट्टी दिली. त्यामुळं, 2 लाखांच्या फरकाने आपला विजय होणार, मी दिल्लीला जाणार असं विश्वासाने जानकरांनी सांगितले होते. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट लढत झाली होती. येथून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हवामानाचा अंदाज वर्तवणारे पंजाबराव डख हेही मैदानात होते. मात्र, परभणीतील निवडणूक जानकर विरुद्ध जाधव यांच्यातच प्रामुख्याने लढली गेली होती. तर, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभावही या मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. मात्र, अंतरवाली सराटीत जानकरांना जास्त मते मिळाल्याचे चित्र दिसले.  


परभणी मतदारसंघात महायुतीचे 4 आमदार


परभणी लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे, हा मतदारसंघ परभणी व जालना ह्या दोन्ही जिल्ह्यांचा आहे. या शिवाय जिंतूर, परभणी, पाथरी आणि गंगाखेड या 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी मतदारसंघात आहे. या 6 मतदारसंघांपैकी जिंतूर व परतूर या 2 मतदारसंघात भाजपचे, गंगाखेड मतदारसंघात रासपचे, घनसांगवीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, पाथरीत काँग्रेसचे आमदार आहेत, तर परभणी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे. म्हणजेच, भाजप वगळता इतर 4 पक्षाचे एक-एक आमदार आहेत. तर महायुतीचे 4 आमदार असल्याचे दिसते.


महत्वाच्या बातम्या:


परभणीत 'बंडू द बॉस'; शिवसैनिकांचा फुल्ल जल्लोष; संजय जाधवांना लाखांच्या मताधिक्याने विजयी, गुलाल लावून सत्कार