मुंबई : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता भाजप समोर बंडोबांना थंड करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.  288 मतदारसंघात मित्रपक्षांसह भाजपच्या कमळावर तब्बल 164 अधिकृत उमेदवारांनी भाजपच्या बी फॉर्म वर उमेदवारी अर्ज भरला आहे.

यामध्ये अनेक उमेदवार आयात केलेले आहेत तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मित्रपक्षांना जागा सोडल्या असल्या तरी त्यापैकीही बहुतांश ठिकाणी उमेदवार भाजपनेच ठरवला आहे. त्यामुळे या सर्व मतदारसंघात स्थानिक पातळीवर असंतोष असून अनेकांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

सध्यस्थीती पाहता खरंतर भाजपच्या 'अब की बार 220 पार' या नाऱ्याला बंडोबा मोठा सुरुंग लावू शकतात. त्यामुळे या बंडोबांना शांत करून त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणीचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उद्या म्हणजे 7 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.  मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व दौरे रद्द करून ते सध्या मुंबईत ठाण मांडून बसलेत. प्रत्येक बंडखोराला हॉटलाईनवर संपर्क साधून आश्वासनांची खैरात दिली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. तरीही उमेदवारी मागे घेतली नाही तर महायुतीत यापुढे कुठलंही स्थान नसेल असं मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे.

भाजपने अशा एकूण 114 बंडखोरांची तयार केलेली यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 27 मतदारसंघात या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक बंडखोरी कोल्हापूरच्या चंदगड या मतदारसंघात पाहायला मिळतेय. चंदवडच्या जागेवर भाजपचा डोळा होता मात्र या जागी शिवसेनेचा उमेदवार लढत असून याठिकाणी एकूण 9 बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाडापाडीचं राजकारण रंगणार आणि त्याचा फटका महायुतीला बसणार अशी चिन्ह दिसतायत. त्यामुळे किती जण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतात आणि किती बंडखोर भाजपची डोकेदुखी वाढवतात यावरून भाजपचं सत्ता स्थापनेचं गणित ठरणार एवढं निश्चित.