विशाखापट्टण : टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अश्विनने कसोटीत सर्वात वेगवान 350 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून अश्विनने जोरदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावात त्याने सात विकेट्स घेत आपल्या विकेट्सची संख्या 349 वर पोहोचवली होती. आज दुसऱ्या डावात पहिली विकेट घेत अश्विनने भारताकडून वेगवान 350 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 66 व्या सामन्यात त्याने 350 विकेट घेतल्या आहेत. यासह त्यानं श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विश्वविक्रमाची बरोबरी केली. भारताकडून अनिल कुंबळेने 77 सामन्यात 350 विकेट तर हरभजन सिंहने 83 सामन्यात 350 विकेट्स घेतल्या होत्या.


श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने 66 व्या कसोटीत 350 वा गडी बाद केला होता. कसोटीमध्ये 800 गडी बाद करणारा मुरलीधरन जगातील एकमेव गोलंदाज आहे.  कसोटीत पाच विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने आतापर्यंत 27 वेळा केली आहे. याशिवाय सात वेळा 10 गडी बाद करण्याची कमालही त्यानं केली आहे.

रोहितनं सिद्धूचा विक्रम मोडला
दरम्यान रोहितनं विशाखापट्टणमधल्या आपल्या खेळीदरम्यान नवज्योत सिंग सिद्धूचा 25 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. रोहितनं या कसोटीत दोन्ही डावात मिळून 13 षटकार ठोकले. या कामगिरीसह एकाच कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा भारतीय फलंदाज होण्याचा मान रोहितनं पटकावला. याआधी हा विक्रम नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावावर होता. सिद्धू यांनी श्रीलंकेविरुद्धच्या लखनऊ कसोटीत आठ षटकार ठोकले होते.

विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मानं दुसऱ्या डावातंही शतकी खेळी साकारली. त्यानं 10 चौकार आणि 7 षटकारांसह 127 धावा उभारल्या. कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा रोहित हा भारताचा सहावा फलंदाज ठरला. त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटीत पहिल्या डावात 176 धावांची खेळी केली होती. याआधी विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं कसोटीच्या दोन्ही डावात शतकं ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता.

रोहित शर्माच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 395 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्याआधी टीम इंडियानं आपला दुसरा डाव चार बाद 323 धावांवर घोषित केला.

दरम्यान, आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी जिंकण्यासाठी दोन विकेट्सची गरज आहे. दुसऱ्या डावात रविंद्र जाडेजाने चार तर शमीने तीन विकेट्स घेत उपाहारापर्यंत आफ्रिकेची अवस्था 8 बाद 117 अशी केली आहे.