मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. त्यात सर्व संपत्ती जाहीर करावी लागते. त्यातलाच एक भाग म्हणजे दर वर्षी मिळणारं उत्पन्नही जाहीर करावं लागतं. संपत्ती म्हणजे सर्व स्थावर जंगम मालमत्ता आणि उत्पन्न म्हणजे दर महिन्याची दरवर्षीची कमाईचा समावेश असतो. सर्वांना पाच वर्षातील प्रत्येक आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्रातील उत्पन्नाचे आकडे द्यावे लागतात.
या आकडेवारीत जाणवणारी एक बाब म्हणजे 2014-15, 2015-2016 या दोन वर्षात अनेक उमेदवारांचे उत्पन्न वाढले आहे. मात्र 2016-17 या आर्थिक वर्षात अनेक उमेदवारांचं उत्पन्न एकदम घसरलं आहे. या वर्षी नोटाबंदी झाली होती हे विशेष. यांच्या उत्पन्नातील घसरणीचा आणि नोटाबंदीचा किती संबंध हा संशोधनाचा विषय आहे. चार प्रमुख पक्षांच्या चार ढोबळमानाने काढलेल्या उमेदवारांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली असता या दोन वर्षात उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली असल्याचे दिसून येत आहे.
घाटकोपर पूर्वचे भाजप उमेदवार पराग शाह आणि पत्नीच्या संपत्तीचा आकडा तब्बल 500 कोटी इतका आहे. 2017 साली बीएमसी लढताना पराग शाह सर्वात श्रीमंत उमेदवार होते तेव्हा त्यांची संपत्ती होती 690 कोटी होती. म्हणजे दोन वर्षात शाह यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 190 कोटींची घट झाली आहे. 2014-15 साली त्यांनी भरलेल्या आयकर विवरणपत्रात त्यांचं उत्पन्न 9 कोटी 42 लाख होतं. 2015-16 साली वाढून 18 कोटी 21 लाख झालं. मात्र 2016-17 सालात ते घसरुन थेट तीन कोटींवर आले
राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं उत्पन्न 2014-15 साली 12 कोटी 41 लाख 308 रुपये होतं ते 2015-16 साली चार कोटी 10 लाखांवर आलं आणि 2016-17 साली तर थेट 37 लाख 38 हजार रुपयांवर घसरलं. त्यानंतरच्या दोन वर्षात ते पुन्हा तीन कोटी 23 लाखांवर पोहोचलं.
शिवसेनेचे वरळीचे आदित्य ठाकरेंचं उत्पन्न 2014-15 साली 22 लाख 15 हजार रुपये होतं, ते 2015-16 साली 85 लाख 50 हजारांवर पोहोचलं मात्र 2016-17 साली नऊ लाख 35 हजार रुपयांवर घसरलं. त्यानंतरच्या दोन वर्षात ते पुन्हा 26 लाख 30 हजारांवर पोहोचलं.
कुलाब्याचे उमेदवार भाई जगताप यांचं उत्पन्न 2014-15 सालच्या आयकर विवरणपत्रानुसार काँग्रेसचे 37 लाख 92 हजार रुपये होतं, त्यात 2015-16 साली सहा कोटी 44 लाख अशी घसघशीत वाढ झाली आहे. मात्र 2016 -17 साली ते थेट 36 लाख पाच हजार रुपयांवर घसरलं. त्यानंतरच्या म्हणजे गेल्या दोन वर्षात उत्पन्न पुन्हा 51 लाख 93 हजारांवर पोहोचलं आहे.
नोटाबंदीच्या वर्षात अनेक उमेदवारांचं उत्पन्न घटलं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2019 12:51 PM (IST)
उत्पन्नातील घसरणीचा आणि नोटाबंदीचा किती संबंध हा संशोधनाचा विषय आहे. चार प्रमुख पक्षांच्या चार ढोबळमानाने काढलेल्या उमेदवारांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली असता या दोन वर्षात उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली असल्याचे दिसून येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -