मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार यश मिळवलं. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस  आणि मित्रपक्षांच्या मिळून महायुतीनं 236 जागा जिंकल्या. महायुतीच्या सरकारची स्थापना काल झाली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपला 132 जागा, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत नेत्यांची आज अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत मित्रपक्षांची मदत आणि भाजपची भूमिका याबाबत पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. भाजपमधून याबाबत पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी याबाबत भाष्य केलं आहे.   

Continues below advertisement

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भूमिका काय? 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील विधानसभेच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवाराची बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीला यशवंत माने,देवेंद्र भुयार,बाळासाहेब आजबे,सुनील टिंगरे,अतुल बेनके आणि राजेश पाटील हे उपस्थित होते. या बैठकीत पराभवाच्या संदर्भात चर्चा झाली आहे आणि त्याचसोबत पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षाच्या मदतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. पराभूत उमेदवारांकडून भाजपच्या भूमिकेच्या बाबतीत नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर अजित पवार यांनी सर्व पराभूत उमेदवार यांना पाठिशी असल्याचं सांगितलं. यापुढे पूर्ण ताकदीनीशी काम करा असे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. पुढच्या निवडणुकीत कसं जिंकून येणार यासंदर्भात काम करा, अशा सूचना दिल्या देखील त्यांनी दिल्या आहेत. 

भाजपमधून पहिली प्रतिक्रिया  

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी याबाबत बोलताना म्हटलं की त्यांच्या अंतर्गत बैठकीत काय झालं माहिती नाही. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एकमेकांचं विश्वासानं काम केलेलं आहे. भाजप तर सोडाच आमचा विचार परिवार आहे, त्यांनी घराघरात जाऊन राष्ट्रवादीचं काम केलं आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारची शंका उपस्थित केली असेल तर ती निराधार असेल, त्याला काही अर्थ असेल असं वाटत नाही, असं भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले. ते टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

Continues below advertisement

दरम्यान, महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळते हे पाहावं लागेल. उद्यापासून विधानसभेचं विशेष अधिवेशन देखील सुरु होणार आहे. त्यामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा होईल. 

इतर बातम्या :

NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांडल्या

हसन मुश्रीफांकडून जाहीर माफी, सुप्रिया सुळेंना टोला; लाडक्या बहिणींसाठी टाटा-बिर्लांचा दाखला