मुंबई : अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार विजयी झाले. यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा मानस व्यक्त केला. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी संघटनात्मक बांधणीकडे देखील देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. या निवडणूक पराभूत उमेदवारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या याशिवाय त्यांना काही सूचना देखील देण्यात आल्या. 


अजित पवारांच्या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील विधानसभेच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवाराची बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीला यशवंत माने,देवेंद्र भुयार,बाळासाहेब आजबे,सुनील टिंगरे,अतुल बेनके आणि राजेश पाटील हे उपस्थित होते. या बैठकीत पराभवाच्या संदर्भात चर्चा झाली आहे आणि त्याचसोबत पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षाच्या मदतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि भाजपच्या भूमिकेच्या बाबतीत नाराजी व्यक्त करण्यात आली.


पुढच्या निवडणुकीतील विजयाच्या दृष्टीनं कामाला लागा


अजित पवार यांनी पराभूत उमेदवारांनी मांडलेले मुद्दे समजून घेतले. सर्व पराभूत उमेदवारांना त्यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं आणि पूर्ण ताकदीनीशी काम करा असे आदेश दिले आहेत. पुढच्या निवडणुकीत कसा जिंकून येणार यासंदर्भात काम करा अशा सूचना दिल्या आहेत.


मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांनाही संधी  


महायुती सरकारच्या तीन प्रमुख नेत्यांचा काल शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळात कुणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार नव्या चेहऱ्यांना देखील संधी दिली जाणार आहे.  
 
दरम्यान, महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीमध्ये विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं जाईल. यामध्ये नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाईल. त्याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे.


इतर बातम्या :


Maharashtra Goverment: दीपक केसरकरांसह तीन विद्यामान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेणार?


राखणदार असतानाही दिवसाढवळ्या उसाच्या फडांना आग, मतदानाच्या दिवसापासून घटना सुरु, माळशिरसमध्ये नेमकं घडतंय काय?