अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्यामुळे आता राजकीय पक्षसुद्धा जोरदार तयारीला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती निर्माण झाल्यानंतर अद्यापही जागा वाटप झालेलं नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Election) सध्या शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. या जागेसाठी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. आता याच यादीत भाजपाचीसुद्धा भर पडली असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी देखील सुरू केल्याचं चित्र आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक मातब्बर नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ आहेत. यात प्रामुख्याने राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे आणि मधुकर पिचड या नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विद्यमान स्थितीत या सातही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार नाही, त्यामुळे ही जागा भाजपला द्यावी अशी मागणी आता भाजपकडून होताना दिसते.
रामदास आठवलेंचीही शिर्डीतून लढण्याची इच्छा
महायुतीकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीसुद्धा या जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या पाठोपाठ आता भाजपाकडूनसुद्धा ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी पुढे येतेय. भाजपाचे जिल्ह्यातील महामंत्री आणि प्रवक्ते नितीन दिनकर हे गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात संपर्क साधत असून त्यांनी आपली भावना यावेळेस बोलून दाखवली.
तिकीट वाटपाचा निर्णय हे भाजपचे वरिष्ठ घेतील असं वक्तव्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करताना अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास बोलून दाखवला.
दरम्यान महायुतीचा जागावाटप अद्याप झालं नाही. महायुतीच्या बैठकीत ही जागा नेमकी कोणाला जाणार यावरच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लढतीच चित्र स्पष्ट होईल हे मात्र नक्की.
गेल्या वेळी आठवले पराभूत
2009 साली लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआयच्या रामदास आठवले यांना पराभवाचा धक्का बसला होता. आपला पराभव झाल्यामुळे शिर्डीचा विकास झाला नसल्याचा आरोप आठवलेंनी केला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे रामदास आठवलेंना पराभवाचा सामना करावा लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. पराभवानंतर रामदास आठवले 2014 साली भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार आणि थेट केंद्रात राज्यमंत्री झाले.
ही बातमी वाचा: